ब्रिटनमधील श्रीमंतांच्या यादीत भारतीय आघाडीवर


लंडन – ब्रिटनमधील २०१७ या वर्षातील १ हजार श्रीमंतांची यादी संडे टाइम्सने प्रसिद्ध केली असून, ४० हून अधिक भारतीय वंशाच्या व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे. १६.२ अब्ज पाऊंडच्या संपत्तीसह भारतीय वंशाचे हिंदुजा बंधु सर्वोच्च स्थानी असून, मागच्यावर्षीच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीमध्ये ३.२ अब्ज पाऊंडनी वाढ झाली आहे. ब्रिटनमधील १३४ अब्जाधीशांच्या एलिट ग्रुपमध्ये श्रीचंद आणि गोपीचंद हे हिंदुजा बंधु पहिल्या स्थानावर आहेत.

हिंदुजा बंधुंनी तेल, गॅस, आयटी,ऊर्जा, मीडिया, बँकिंग, प्रॉपर्टी आणि आरोग्य या क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. हिंदुजा बंधु मागच्यावर्षी ब्रिटनमधील सर्वाधिक श्रीमंतांमध्ये दुस-या स्थानावर होते. यावर्षी युक्रेनियन उद्योगपती लेन ब्लावाटनीक १५.९ अब्ज पाऊंडच्या संपत्तीसह दुस-या स्थानावर आहे.

मागच्यावर्षी भारतात जन्मलेले डेविड आणि सिमॉन बंधु पहिल्या स्थानावर होते. ते आता तिस-या स्थानावर फेकले गेले आहेत. १४ अब्ज पाऊंडची संपत्ती त्यांच्याकडे आहे. १३.२ अब्ज पाऊंडच्या संपत्तीसह प्रसिद्ध स्टील उद्योजक लक्ष्मी मित्तल चौथ्या स्थानावर आहेत. जगात सर्वाधिक स्टीलची निर्मिती करणारे लक्ष्मी मित्तल यांच्या संपत्तीमध्ये ६.१ अब्ज पाऊंडनी वाढ झाली आहे.

Leave a Comment