बीएसएनएल नक्षलग्रस्त भागात उभारणार ३ हजार टॉवर !


नवी दिल्ली – आणखी ३ हजार टेलिकॉम टॉवर सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल उभारणार असून बीएसएनएलला तात्काळ हे टॉवर नक्षलग्रस्त भागात सॅटेलाइट बँडविड्थ वाढविण्यासाठी उभारण्यासाठी सांगितले जाऊ शकते. सुरक्षा दलामध्ये नक्षलग्रस्त भागात उत्तम संवादासाठी हे टॉवर उभारण्याची योजना आहे.

टेलिकॉम टॉवर लावण्याच्या या मुद्यावर सुकमा हल्ल्याच्या चौकशीनंतर अंतिम निर्णय होईल. सुकमामध्ये झालेल्या नक्षली हल्ल्यात सीआरपीएफचे २५ जवान मारले गेले होते. नक्षलवाद्यांचा प्रभाव असणाऱ्या बिहार, छत्तीसगड, झारखंड, आंध्र प्रदेश, ओडिशा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या ७ राज्यांत आधी २,२०० टेलिकॉम टॉवर लावण्यात आले होते. यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये २२७, बिहारमध्ये १८४, छत्तीसगडमध्ये ७९७, झारखंडमध्ये ७८२, ओडिशामध्ये २५३, मध्य प्रदेशमध्ये २२ आणि महाराष्ट्रात ६० निर्जन आणि नक्षलग्रस्त भागात टेलिकॉम टॉवर उभारण्यात आले आहेत.

डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉमनुसार, निर्जन किंवा नक्षलग्रस्त भागात असणाऱ्या नेटवर्कवर सरासरी १.३ लाख अर्लांग वायस आणि १७५ जीबी डेली डाटा ट्रॅफीक असते. एक अर्लांग एक कॉलच्या इतके असते. यात कॉल अटेम्पट्स आणि होल्डिंग टाइमचा समावेश असतो.

Leave a Comment