बिहारमधले मोरांचे गांव- आरण


महाराष्ट्रात मोराची चिंचोली या गावाने पर्यटकांना आकर्षित करून घेण्यात चांगलेच यश मिळविले आहे त्याच धर्तीवर आता बिहारच्या सहरसा जिल्ह्यातील आरण हे गांव मोरांचे गांव म्हणून प्रसिद्ध झाले आहे. या गावात प्रवेश केला की मोरच स्वागताला हजर असतात. अर्थात हे मोर पिंजल्यात कोंडले गेलेले नाहीत तर घरात, दारात, गच्चीवर, आसपासच्या परिसरात ते मुक्तपणे हिंडताना दिसतात. गावातील लोकांबरोबर हे मोर इतके मिसळले आहेत की लोकांची दखल ते घेत नाहीत पण परका माणूस जर दिसला तर मात्र ते बुजतात व कुठेतरी जाऊन लपतात.

असे समजते की या गावातील अभिनंदन यादव यांनी १९८४-८५ मध्ये पंजाबमधून मोरांची एक जोडी आणली होती व त्यांच्या कुटुंबाचा विस्तार होत होत आता या गावात २०० ते २५० मोर झाले आहेत. बिहारच्या पूर्व चंपारण्यमधील माधोपूर येथेही असेच मोर खूप संख्येने आहेत. त्यामुळे आरण हे बिहारमधील दुसरे मोरांचे नांव बनले आहे. या गावाभोवती हिरवळ खूप आहे, झाडे खूप आहेत व मोरांची नागरिकांशी दोस्ती आहे. त्यामुळे मोर त्यांची अंडी गावातच झाडाझुडपांतून घालतात व त्यांना कोणीही इजा करत नाही. हे मोर धान्याचा फडशा पाडतात व शेतातील पेरलेले बीही खातात. मात्र तरीही गावाच्या सौंदर्यासाठी त्यांचा हा त्रास गावकरी आनंदाने सहन करतात. मोरांच्या गळलेल्या पिसांतून घराघरात सजावटी केलेली दिसते. एखादा मोर गावाबाहेर गेला तरी तो पुन्हा या गावात येतो असेही लोक सांगतात.

या गावाचा विकास पर्यटनस्थळ म्हणून करण्यासंदर्भात वनविभाग विचार करत असल्याचेही समजते.

Leave a Comment