आम आदमी पार्टीची औकात


आम आदमी पार्टीतला गोंधळ, परस्परावर केले जाणारे आरोप, पक्षातली बेदिली आणि एकूणच पक्षाचा सुरू असलेला अधःपतनाकडचा प्रवास पाहिला म्हणजे मोठा गंभीर प्रश्‍न मनात निर्माण होतो. या लोकांनी राजकीय पक्ष स्थापन केला खरा परंतु एखादा राजकीय पक्ष स्थापन करून, त्याच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवण्यासाठी आवश्यक असलेली लायकी या लोकांकडे आहे का? कारण पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांनी देशाला भ्रष्टाचार मुक्त करण्याची प्रतिज्ञा करून सार्वजनिक जीवनात प्रवेश केला होता आणि आता ते स्वतःच भ्रष्टाचाराच्या आरोपात लिप्त झाले असून त्यामुळे त्यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात आले आहे. मुळात अरविंद केजरीवाल हे भ्रष्टाचारमुक्ती आंदोलन चालवणारे कार्यकर्ते होते आणि अतीशय बालिशपणे ते स्वतःचे आंदोलन चालवत होते. त्यांच्या आंदोलनातून देशातला एखादा मोठा भ्रष्ट राजकीय नेता अडचणीत आला आहे, त्याचा भ्रष्टाचार सिध्द झाला आहे आणि त्याला त्या भ्रष्टाचाराबद्दल राजीनामा द्यावा लागला आहे असा एकही प्रकार त्यांच्या आंदोलनातून झालेला नाही.

देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्याची प्रतिज्ञा करून अरविंद केजरीवाल मैदानात उतरलेले आहेत. परंतु त्यांनी आजवर काही नेत्यांची नावे घेऊन आणि काही नेत्यांची नावे न घेता त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा तथाकथित पर्दाफाश केलेला आहे. पण हा पर्दाफाश म्हणजे वरवरचे आरोप आहेत. त्यातल्या एकाही आरोपाचे पुरावे त्यांनी कधी सादर केलेले नाहीत. आता ते स्वतःच अशाच प्रकारच्या आरोपांनी घेरले गेलेले आहेत. त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील जलसंधारण मंत्री कपिल मिश्रा यांना काल मंत्रिमंडळातून काढून टाकले. मंत्रिपदावरून पदावनत झाल्यानंतर मिश्रा यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अरविंद केजरीवाल यांना थेट लक्ष्य करत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. केजरीवाल यांनी आपल्या मंत्रिमंडळातील अन्य एक मंंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडून २ कोटी रुपये घेतले असा आरोप मिश्रा यांनी केला आहे. हे २ कोटी रुपये घेत असताना आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलेले आहे असे सांगून आपला आरोप हा साधार असल्याचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. केजरीवाल यांनी २ कोटी रुपये घेतले की नाही हे त्यांना स्वतःलाच माहीत आहे. परंतु एखाद्या व्यक्तींनी पैसे घेताना डोळ्याने पाहिले असे म्हटल्याने कोणावरचाही लाच घेतल्याचा आरोप सिध्द होऊ शकत नाही. डोळ्याने पाहिले हा न्यायालयात पुरावा म्हणून मानला जात नाही.

परिणामी, मिश्रा यांचा आरोप ही एक राजकारणी चाल आहे. तिच्यावरून केजरीवाल यांना शिक्षा होणार नाही. कपिल मिश्रा यांनासुध्दा या गोष्टीची माहिती आहे. त्यांनीही आपल्याला मंत्रिमंडळातून काढल्यामुळे चिडून असा आरोप केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र केजरीवाल यांना या गोष्टीचे उत्तर द्यावे लागणार आहे. कारण त्यांनीही आजवर ज्या ज्या लोकांना भ्रष्टाचारासाठी म्हणून लक्ष्य केले त्या सर्वांवर असेच निराधार आरोप केलेले आहेत. केजरीवाल नेहमी भ्रष्टाचाराविरुध्द भाषणे करतात तेव्हा त्या भ्रष्टाचाराचा किंचितसुध्दा पुरावा सादर करत नाहीत. काही वेळा ते पुरावे सादर केल्याचे नाटक करतात किंवा कसलेतरी कागदपत्रे दाखवून तेच पुरावे असल्याचे भासवतात पण न्यायालयाच्या भाषेत ती कागदपत्रे म्हणजे पुरावा नसतो. तेव्हा केजरीवाल एखादा माणूस कालपर्यंत लुनावर फिरत होता पण आज मात्र कारमध्ये फिरत आहे म्हणजे तो भ्रष्ट आहे असा युक्तिवाद करत असतो. कालपर्यंत लुनावर फिरणारा माणूस आज कारमध्ये फिरायला लागला म्हणजे तो भ्रष्टच असतो हे देशातले कोणते तरी न्यायालय मान्य करील का?

केजरीवाल यांना त्याची पर्वा नाही. कारण त्यांना मुळी भ्रष्टाचार निर्मुलन करण्यात रसच नाही. आपण तेवढे स्वच्छ आणि देशातले अन्य नेते भ्रष्ट असे चित्र निर्माण करून त्यांना स्वतःचे महत्व वाढवायचे आहे. मात्र असे करतानाच ते प्रचंड अडचणीत आलेले आहेत. उगीच उठून कोणावर तरी पोरकटपणाने आरोप करायचे हे त्यांचे सत्र त्यांना अंगलट आलेले आहे. त्यांनी गेल्या निवडणुकीत १४ नेत्यांची नावे घेऊन हे सारे चोर आहेत अशी घोषणा केली होती. ती घोषणा त्यांच्या एवढी अंगल आली की आता त्यांच्यावर कोणत्याही क्षणी तुरुंगात जाण्याची वेळ येणार आहे. नितीन गडकरी, कपिल सिब्बल, अरुण जेटली अशा काही लोकांनी त्यांच्यावर अब्रू नुकसानीचे खटले दाखल केले आहेत. त्यांची बदनामी करण्याइतके कसलेही पुरावे केजरीवाल यांच्याकडे नाहीत. त्यामुळे त्यांना न्यायालयामध्ये आपली बाजू मांडण्यासाठी राम जेठमलानीसारखा महागडा वकील लावावा लागला आहे. त्याची फी देणे त्यांच्यासाठी अशक्य आहे. म्हणून त्यांनी सरकारी खजिन्यातून फी देण्याची कोशीश केली. ती त्यांच्या अंगलट आली. आता डझनभर खटले चालवण्यासाठी करोडो रुपयांची गरज आहे आणि त्या गरजेतूनच अरविंद केजरीवाल फसत चालले आहेत. तुरुंगाची वारी चुकवण्यासाठी त्यांची धडपड आहे. त्यातूनच ते अशा करोडो रुपयांच्या भ्रष्टाचारात गुंतले असण्याची शक्यता आहे.

Leave a Comment