आता शाकाहारी फास्ट फूड विकणार पतंजली


नवी दिल्ली – पतंजलीच्या उत्पादनांनी एफएमसीजी सेक्टरमध्ये भक्कम स्थान निर्माण केल्यानंतर आता केएफसी आणि मॅकडॉनल्डससारख्या दिग्गज बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या फास्ट फूड चेनला टक्कर देण्याची तयारी रामदेव बाबा करत आहेत. रामदेव बाबा शाकाहारप्रती जागतिक आकर्षण पाहता देशभरात क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट (क्यूएसआर) सुरू करण्याची तयारी करत आहेत. ४०० हून अधिक रेसिपी या रेस्टॉरंटमधून मिळतील. त्याचबरोबर पतंजलीची जिन्स आणि क्रीडा पोषाख आणि साहित्य बनवण्याची योजनाही आहे.

शाकाहारी भोजनापेक्षा स्वादिष्ट आणि हितकारक काही भारतीयांना असूच शकत नाही, म्हणून लोकांना आम्ही पर्याय देत आहोत. उत्तर भारतीय किंवा दक्षिण भारतीय अशी विभागणी आम्ही आमच्या मेन्यूची करणार नाही. आम्ही आमची रेसिपी जेव्हा लोकांमध्ये घेऊन जाऊ, तेव्हा या सर्व बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या लोकांना चिकन आणि मटन खाऊ घालत आहेत. त्यांना आमच्याशी स्पर्धा करणे कठीण जाईल, अशी माहिती रामदेव बाबा यांनी ‘टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.

देशात विकले जाणारे फास्ट फूड हे ६० ते ७० टक्के शाकाहारी असून पिझ्झा आणि बर्गरचाही यामध्ये समावेश आहे. लोकांचा शाकाहाराकडे वाढलेला कल यामुळे क्विक सर्व्हिस रेस्टॉरंटनी देशात आपल्या मेन्यूमध्ये शाकाहारीचा समावेश केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही आपला रेस्टॉरंट सुरू करण्याचा विचार असल्याचे रामदेव बाबा यांनी या वेळी सांगितले. अनेक देशांचा दौरा मी केलेला आहे. शाकाहाराकडे तेथील लोकांचा कल वाढत आहे. शाकाहारी पदार्थ खाण्यासाठी लोक रांगेत उभे राहण्यासही तयार असतात, असे रामदेव बाबा यांनी सांगितले.

Leave a Comment