गुगल मॅपमुळे पर्यटकांना तब्बल ३० किलोमीटरची भ्रमंती


तुम्ही गुगल मॅपवर विसंबून राहत असाल तर सावधान. नॉर्वेत एका प्रसिद्ध पर्वतशिखराच्या शोधात गेलेल्या शेकडो पर्यटकांना गुगल मॅपमुळे तब्बल ३० किलोमीटरची भ्रमंती करावी लागली.

प्राईकेस्टोलेन किंवा पल्पिट रॉक नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पर्वतशिखरांना दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. मात्र गुगल मॅपवर या शिखराची जागा चुकली असून ती ३० किलोमीटर दूर असलेल्या फॉसमॉर्क या खेड्यात दाखवली आहे.

“आम्ही शेकडो पर्यटकांना हे दाखवून परत पाठवले आहे, की ते चुकीच्या ठिकाणी आले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत दररोज १०-१५ कार येथे येतात,” असे फॉसमॉर्क गावातील हेल्ग फॉसमॉर्क या गृहस्थाने नॉर्वेतील स्टॅव्हँजर आफ्टेनबाल्ड या वृत्तपत्राला सांगितले.

उन्हाळ्यात अनेकदा तर मिनीबसच्या रांगाच्या रांगा गावाबाहेर उभ्या असतात, असेही त्याने सांगितले.

दरम्यान या वृत्तपत्राने गुगल नॉर्वेचा कर्मचारी हेल स्केर्व्होल्ड याच्याशी संपर्क साधला असता त्याने लोकांच्या प्रतिसादाचे स्वागत केले. आम्ही गुगल मॅप्स सुधारण्यासाठी कायम प्रयत्न करत असतो आणि कोणतीही समस्या लोकांनी सांगावी यासाठी प्रोत्साहन देत असतो, असे स्केर्व्होल्डने इ-मेलमध्ये लिहिले आहे.

Leave a Comment