तापमानवाढीचे अधिक अचूक परिणाम दर्शविण्याचा शास्त्रज्ञांचा दावा


अल्प व दीर्घ मुदतीच्या उपाययोजनांसाठी ठरू शकेल उपयुक्त
न्यूयॉर्क: हरितगृह वायू उत्सर्जनामुळे होणाऱ्या जागतिक तापमान वाढीमुळे होणाऱ्या अल्प व दीर्घकालीन परिणामांचे अधिक अचूक आणि व्यापक मापन करण्याची पद्वरती विकत करण्यात यश आल्याचा दावा हार्वर्ड युनिव्हर्सिटी, प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी आणि एन्व्हायर्नमेंटल डिफेन्स फंड यांच्या संशोधकांच्या पथकाने केला आहे. मात्र त्याचा प्रभावी उपयोग करण्यासाठी एखाद्या देशाने त्याचा अवलंब करण्याऐवजी अधिक व्यापक पातळीवर त्याचा अवलंब करणे आवश्यक आहे; असे माताही या पथकाने ‘सायन्स’ या विज्ञान विषयक साप्ताहिकात प्रसिद्ध केलेल्या निबंधात व्यक्त केले आहे.

उत्सर्जित होणाऱ्या विविध वायूंचे अस्तित्व वेगवेगळ्या काळापुरते असते. तसेच त्याचे होणारे परिणामही विशिष्ट काळापुरते शिल्लक राहू शकतात. काही वायू आणि त्यांचे वातावरणातील परिणाम अल्पकालीन असतात; तर काही वायू व त्यांचे परिणाम दीर्घ काळ टिकून राहतात. त्यामुळे त्यांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी करण्याच्या उपाययोजनाही वेगवेगळ्या असू शकतात. हे लक्षात घेऊन या शास्त्रज्ञांनी उत्सर्जित वायूंचे २० वर्षात होणारे परिणाम आणि १०० वर्षात होणारे परिणाम असे द्विस्तरीय मोजमाप उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे.

या निष्कर्षांमुळे हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे, जागतिक तापमान वाढ रोखणे यासाठी आवश्यक असलेल्या अल्प मुदतीच्या व दीर्घ मुदतीच्या उपाययोजना निश्चित करण्यासाठी धोरणकर्ते आणि अभ्यासक यांना मदत होऊ शकेल; असा या शास्त्रज्ञांचा दावा आहे. त्याचप्रमाणे परस्परविरोधी दावे करणाऱ्या अभ्यासकांमधील वाद संपुष्टात येण्यासही या माहितीचा उपयोग होणार आहे. उदाहरणार्थ नैसर्गिक वायूंचा इंधन म्हणून वापर करणारे शास्त्रज्ञ त्याच्या १०० वर्षांनी होणाऱ्या परिणामांचा आधार घेतात; तर त्याला विरोध करणारे शास्त्रज्ञ त्याचे २० वर्षातील परिणाम पुढे करतात. मात्र या नव्या पद्धतीचा वापर केल्यामुळे दोन्ही प्रकारांची तुलना करून मध्यम अथवा योग्य मार्गाची निवड करणे सुलभ होईल; असा या पथकाचा दावा आहे.

आपण विकसित केलेल्या द्विस्तरीय परिणाम मापनाचा अधिकाधिक फायदा करून घ्यायचा असेल; तर केवळ अमेरिकेसारख्या एखाद्या देशाच्या संबंधित संस्थांनी त्याचा उपयोग करून पुरणार नाही; तर संयुक्त राष्ट्र, ‘इंटरगव्हर्नमेंटल पॅनल व क्लायमॅट चेंज’ अशा आंतरराष्ट्रीय, बहुद्देशीय संस्थांनी त्यात पुढाकार घेणे आवश्यक आहे; असेही या पथकाने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment