
जपान – भारतीय अर्थव्यवस्थेला येत्या जुलै महिन्यापासून लागू होत असलेल्या वस्तू आणि सेवा कर कायद्यामुळे (जीएसटी) चांगला फायदा होईल. याचे परिणाम आगामी आर्थिक वर्षात पाहायला मिळतील, असा विश्वास केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी व्यक केला.
जीएसटीमुळे देशाचा विकासदर ८ टक्क्यांपर्यंत पोहचेल – शक्तिकांत दास
जपानमध्ये आशियाई विकास बँकेच्या ५०व्या वार्षिक बैठकीच्या पार्श्वभूमीवर दास यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दास यांनी यावेळी गेल्या दोन आर्थिक वर्षांच्या तुलनेत २०१८-१९ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर ८ टक्के इतका राहील, असा अंदाज व्यक्त केला. सध्या अनेक आर्थिक सुधारणा राबवण्याच्यादृष्टीने केंद्र सरकार काम करत आहे. याशिवाय, निश्चलनीकरणाच्या निर्णयामुळे कराचा पाया विस्तारेल. तसेच समांतर अर्थव्यवस्थेला आळा बसेल, असे मत दास यांनी मांडले.
देशाची अर्थव्यवस्था २०१७-१८ या चालू आर्थिक वर्षात ७.५ टक्क्यांनी वाढेल, असा आमचा अंदाज आहे. जीएसटी करप्रणाली येत्या, १ जुलैपासून लागू होत असल्यामुळे उर्वरित नऊ महिन्यात त्याचे काही सकारात्मक परिणाम बघायला मिळतील. परिणामी २०१८-१९ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ८ टक्के दराने घौडदौड करेल, असे दास यांनी म्हटले.
