घराचे किंवा जमिनीचे कर्ज पीएफ मधून फेडता येणार!


पुणे: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओ विभागाने पीएफ खातेधारकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक नवीन योजना जाहीर केली आहे. हे नोकरदार या नव्या योजनेनुसार पीएफ भरतात त्यांना त्यांच्या ‘पीएफ’च्या रकमेतून फ्लॅट विकत घेणे, स्वतःचे घर बांधणे किंवा जमीन खरेदी करणे अशी कामे करता येणार आहेत. कर्जाचा समान मासिक हप्ता (ईएमआय) भरण्याची सुविधा कर्मचाऱ्यांच्या ‘पीएफ’ मधूनच उपलब्ध करण्यात आली आहे.

पीएफच्या अनेक नियमांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये बदल करण्यात आले आहेत. खातेदारांना त्यांच्या पीएफचा काही महत्वाच्या गोष्टींसाठी फायदा घेता यावा यासाठी हे नवे नियम तयार करण्यात आले आहेत. स्वत:चे घर असावे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. तसेच देशातील प्रत्येक नागरिकाला स्वत:चे हक्काचे घर मिळवून देणार असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिला आहे. मात्र घरांच्या, जागेंच्या वाढलेल्या किंमतींमुळे प्रत्येकाला घर घेणे तितके सोपे होत नाही.

याबाबतचे वृत्त महाराष्ट्र टाईम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वॄत्तानुसार, ईपीएफओ खात्याने आणलेल्या नव्या योजनेनुसार आता किमान तीन वर्षे नोकरी केलेल्या आणि ‘पीएफ’ खात्यामध्ये कमीत कमी २० हजार रुपये शिल्लक असलेल्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेनुसार ‘पीएफ’च्या दहा सदस्यांना एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करावी लागणार आहे. ही संस्था नोंदणीकृत झाल्यास ‘पीएफ’मधील ९० टक्के रक्कम काढता येणार आहे. त्यातून संबंधित सदस्यांना जमीन खरेदी करणे, इमारत बांधणे किंवा फ्लॅट घरेदी करता येणार असल्याचे ‘ईपीएफओ’च्या पुणे विभागाकडून सांगण्यात आले.

‘पीएफ’ची रक्कम काढण्यात आल्यानंतर संबंधित सदस्यांनी घर खरेदी, घर बांधणी किंवा जमीन खरेदी ही केलीच पाहिजे, अशी सक्ती या योजनेअंतर्गत करण्यात आली आहे. काही कारणास्तव घर किंवा जमीन खरेदीचा व्यवहार होऊ शकला नाही, तर काढण्यात आलेली ‘पीएफ’ची रक्कम पुन्हा ‘ईपीएफओ’कडे जमा करावी लागणार आहे. नागरिकांनी याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा. याशिवाय ईपीएफओच्या www.epfindia.gov.in या वेबसाइटवर माहिती देण्यात आली आहे.

Leave a Comment