गोव्यात आता सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांना तुरुंगवारी


पणजी – देशी आणि परदेशी नागरिकांच्या मुक्तवावरासाठी आणि मद्यशौकीसाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात आता सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्यास थेट कारागृहाची हवा खावी लागणार आहे. याबाबत गोवा पोलीस दलाने उघडय़ावर सर्वासमक्ष मद्यपान करणाऱ्यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. कलंगुट पोलीस ठाण्यात सर्वसाधारण नागरिक, पर्यटन क्षेत्रातील प्रतिनिधी आणि पोलीस यांची बैठक झाल्यानंतर वरील आदेश देण्यात आले आहेत. या बैठकीला जवळपास ६०-७० जण हजर होते.

जर कोणी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करीत असल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी म्हणजे कारवाई करणे सोपे होईल, असे आवाहन कश्यप यांनी जनतेला केले आहे. पर्यटक रात्रीच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर मद्यपान करीत असल्याच्या प्रकारांबद्दलही या बैठकीत चर्चा झाली. येथील पर्यटक आणि स्थानिक उघडपणे मद्यपान करतात आणि त्यानंतर भांडणे आणि हाणामाऱ्या निर्माण झाल्यास मद्याच्या बाटल्या फोडून एकमेकांवर प्रहार करतात. या प्रकाराने निव्वळ पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांना त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे उत्तर गोवा पोलीस अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी सांगितले.

Leave a Comment