फेसबुकची एक्स्प्रेस वायफाय सेवा सुरू


सोशल मिडीया नेटवर्क कंपनी फेसबुकने गुरूवारी भारतात त्यांची एक्स्प्रेस वायफाय सेवा सुरू केली आहे. या सेवेचा उद्देश ग्रामीण भागातील युजर्सना सार्वजनिक हॉटस्पॉट इंटरनेट सुविधा पुरविणे हा आहे. या सेवेसाठी फेसबुकने भारती एअरटेलशी भागीदारी केली असून येत्या कांही महिन्यात देशात २० हजारांहून अधिक ठिकाणी वायफाय हॉटस्पॉट निर्माण केले जाणार आहेत.

फेसबुकचा यापूर्वीचा फ्री बेसिक्स कार्यक्रम विवादास्पद ठरल्याने तो अमलात आणला गेला नव्हता. त्यानंतर १ वर्षांच्या कालावधीने ही नवी सेवा सुरू केली जात आहे. फ्री बेसिक्स अंतर्गत कांही निवडक वेबसाईट निःशुल्क दिल्या जाणार होत्या. नवी एक्स्प्रेस सेवा पेड सेवा आहे. त्यात कोणतीही वेबसाईट हॉटस्पॉटवरून अक्सेस करता येणार आहे. त्यासाठी दैनिक, साप्ताहिक अथवा मासिक डेटा पॅक खरेदी करता येणार आहे. उत्तराखंड, गुजराथ, राजस्थान व मेघालय या राज्यांत त्यासाठी ७०० हॉटस्पॉट निर्माण केले जाणार आहेत असेही समजते.