हिंसक व्हिडिओ हटवण्यासाठी फेसबुकमध्ये ३००० जणांची भरती


फेसबुकवरील आक्षेपार्ह सामग्रीवर कारवाई करण्यासाठी तसेच हिंसक चित्रफीती काढून टाकण्यासाठी फेसबुक कंपनी ३००० जणांची भरती करणार आहे. फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग याने बुधवारी ही माहिती दिली.

सध्या फेसबुकवरील हिंसक आशय असलेल्या दृश्यफीती किंवा मजकुरावर खास सॉफ्टवेयरद्वारे लक्ष ठेवले जाते. मात्र ही उपाययोजना पुरेशी नाही, हे झुकेरबर्गच्या घोषणेमुळे स्पष्ट होते असे मानले जात आहे. खासकरून गेल्या वर्षी फेसबुक लाईव्ह ही सेवा सुरू केल्यापासून यात हिंसक घटनांचे मोठ्या प्रमाणावर प्रक्षेपण होत आहे. या सेवेद्वारे कोणालाही प्रत्यक्ष प्रक्षेपण करता येते.

फेसबुकच्या नियमांचा भंग करणाऱ्या नोंदीवर लक्ष ठेवणाऱ्या ४५०० जणांमध्ये या ३००० जणांची भर टाकण्यात येईल, असे झुकेरबर्गने फेसबुकवरील एका नोंदीत म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात थायलंडमधील एका व्यक्तीने स्वतःच्या मुलीचा खून करताना त्याचे चित्रण प्रत्यक्ष प्रक्षेपित केले होते. एका दिवसात ३७ हजार जणांनी तो पाहिला होता. त्यानंतर फेसबुकने तो काढून टाकला होता.

या ३००० कर्मचाऱ्यांची पदे नव्याने निर्माण केले जातील आणि ते फक्त चित्रफीतीच नव्हे तर सर्व प्रकारच्या साहित्यावर लक्ष ठेवतील, असे कंपनीने म्हटले आहे.

Leave a Comment