आता खाद्यपदार्थांची होम डिलिव्हरी करणार ‘उबेर’


मुंबई : आता खाद्यपदार्थांच्या व्यवसायातही कॅब सेवा देणारी ‘उबेर’ कंपनी पाऊल ठेवत असून उबेर कंपनी ‘उबेरईट्स’ या उपक्रमाच्या अंतर्गत खाद्यपदार्थ घरपोच पुरवण्याची नवी सेवा सुरु करणार आहे. उबेर कंपनीने या सेवेसाठी सुमारे २०० रेस्टॉरंटशी करार केला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना उबेरईट्स इंडियाचे प्रमुख भाविक राठोड यांनी सांगितले, उबेरईट्स भारतात सुरु करणे म्हणजे कंपनीच्या जागतिक स्तरावरील विस्ताराच्या दिशेने अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. या सेवेला मुंबईमधून सुरुवात केली जाणार आहे. ‘उबेरईट्स’ सेवेची सुरुवात जरी मुंबईत होत असली, तरी आगामी काळात दिल्ली, बंगळुरु, चेन्नई, कोलकाता यांसारख्या भारतातील मेट्रोसिटीमध्ये ही सेवा वाढवली जाणार आहे. मात्र, मुंबई वगळता इतर शहरांमध्ये सेवेची सुरुवात कधी केली जाईल, याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.

कंपनीकडून ‘उबेरईट्स’मध्ये किती गुंतवणूक करण्यात आली आहे, याबाबत मात्र भाविक राठोड यांनी काहीही सांगितले नाही. दरम्यान, उबेर कंपनीच्या या नव्या सेवेमुळे खाद्यपदार्थांची होम डिलिव्हरी करणाऱ्या इतर कंपन्यांना मोठे आव्हान उभे राहणार आहे.

Leave a Comment