पेन रिलिफसाठी निवडा पॅरासिटामॉल किंवा बिअर


आता एक हक्काचे आणि आरोग्याशी निगडीत असे कारण बिअर पिणाऱ्यांसाठी मिळाले असून पॅरासिटामॉलपेक्षाही बिअर ही प्रभावी वेदनाशामक असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे.

सुमारे ४०० जणांवर यूकेमधील ग्रीनविच युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी केलेल्या १८ सर्वेक्षणांमध्ये ही लक्षवेधी बाब समोर आल्यामुळे फक्त हँगओवर मिळवण्यासाठी नाही तर पेन रिलिफ मिळावा यासाठी आता बिअरचे सेवन केले जाणार आहे. मेंदूतील चेतातंतूंवर बिअर प्यायल्यामुळे परीणाम होऊन वेदना शमवता येतात का, याचा अभ्यास करण्यात आला. त्यावेळी बिअरचे प्रमाण जितके जास्त, तितक्या सहभागींना वेदना कमी जाणवल्याचे संशोधकांच्या समोर आले.

ग्रिनविच युनिव्हर्सिटीच्या ट्रेवॉर थॉमसन यांनी अल्कोहोल ही अत्यंत प्रभावी वेदनाशामक असल्याचे सबळ पुरावे मिळाले असे म्हटल्याचं ‘द सन’ या ब्रिटीश वृत्तापत्राने छापले आहे. विशेष म्हणजे पॅरासिटामॉलशी तुलना करता बिअर अधिक प्रभावी असल्याचे समोर आले आहे.

बिअर ही वैद्यकीयदृष्ट्या वेदनेची तीव्रता कमी करण्यासाठी परिणामकारक असल्याचे संशोधनात समोर आले आहे. मात्र दीर्घकालीन वेदना शमवण्यासाठी बिअर हा उपाय नसल्याचेही स्पष्ट करण्यात आल्यामुळे साईड इफेक्ट टाळून अशा पद्धतीने एखादा ड्रग तयार करता आला, तर सध्याच्या घडीला उपलब्ध असलेल्या वेदनाशामकांपेक्षा तो प्रभावी ठरेल, असा विश्वास थॉमसन यांना वाटतो.