अॅपलची गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉनला धोबीपछाड


नवी दिल्ली – जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलसह मायक्रोसॉफ्ट आणि अॅमेझॉनसारख्या कंपन्यांनाही पैशांच्या बाबतीत तंत्रज्ञानाच्या मायाजाळात ‘न भूतो..’ आणि डोळे विस्फारून टाकणाऱ्या उत्पादनांच्या निर्मितीत अग्रेसर असलेल्या ‘अॅपल’ने आणखी एक अफाट कामगिरी करून दाखवली आहे. विक्रीयोग्य सुरक्षिततेसह तब्बल २५६ अब्ज अमेरिकन डॉलर ऐवढी रोकड अॅपलकडे असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये अॅपलला उत्पादनांच्या विक्रीत घट झाल्याने झटका बसला होता. कंपनीच्या माहितीनुसार, यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत पहिल्या तिमाहित आयपॅड, आयफोनच्या विक्रीत घट झाली आहे. ५०.७६ दशलक्ष आयफोनची विक्री कंपनीने केली आहे. पण गेल्या वर्षीच्या तुलनेत ती ५१.१९ दशलक्षपेक्षा कमी म्हणजेच एक टक्का कमी आहे. मात्र असे असले तरी अॅपल कंपनीची कमाई आणि महसूल आधीपेक्षा अधिक आहे.

अॅपल, गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि अॅमेझॉन या सध्याच्या आघाडीच्या चारही कंपन्यांचा चालू वर्षाच्या तिमाहीतील महसूल, नफा, शिलकी रक्कम याबाबत ‘गीकवायर’ने तुलनात्मक आढावा घेतला आहे. यात अॅपल रोकडच्या बाबतीत ‘श्रीमंत’ ठरला आहे. अॅपल २५६ अब्ज अमेरिकन डॉलर रोकडसह अव्वल स्थानी तर त्यानंतर मायक्रोसॉफ्टचा क्रमांक लागतो. १२६ अब्ज अमेरिकन डॉलर ऐवढी रोकड मायक्रोसॉफ्टकडे आहे. गुगलची पालक कंपनी असलेल्या अल्फाबेटकडे ९२ अब्ज अमेरिकन डॉलर, तर अॅमेझॉनकडे २२ अब्ज अमेरिकन डॉलर ऐवढी रोकड आहे. फेसबुकनेही नुकतेच पहिल्या तिमाहीतील उत्पन्न जाहीर केले. फेसबुककडे २९.४५ अब्ज अमेरिकन डॉलर ऐवढी रोकड असल्याची माहिती देण्यात आली आहे.