अ‍ॅमेझॉन देणार ५००० भारतीयांना रोजगार


बंगळुरू – आता भारतात हातपाय पसरण्यासाठी ई-कॉमर्समधील आघाडीची कंपनी असलेल्या अ‍ॅमेझॉनने पाऊल उचलले असून भारतात जवळपास पाच हजार लोकांना अ‍ॅमेझॉन रोजगार उपलब्ध करून देणार असल्याची माहिती बिझनेस स्टँडर्डने दिली आहे. ग्राहकांना वस्तू लवकरात लवकर घरपोच मिळाव्यात, यासाठी गोदामांच्या संख्येत वाढ करण्याची तयारी देखील अ‍ॅमेझॉन या कंपनीने दर्शवली आहे.

१४ नवी गोदामे आणि सेवा केंद्रे सुरू करण्याचा विचार कंपनीचा असल्यामुळे कंपनीच्या वस्तू साठवून ठेवण्याच्या क्षमतेत वाढ होऊन अनेकांना नोक-या मिळणार आहेत, असे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीच्या ग्राहकांना वाढीव गोदामांमुळे अधिक जलद सेवा मिळण्याची शक्यता आहे. तसेच विक्रेत्यांनाही स्वतःची विविध उत्पादने विकता येणार आहेत. अ‍ॅमेझॉनकडून सण-उत्सवांच्या वेळी अतिरिक्त मनुष्यबळ वाढवण्यात येणार आहे. मात्र या केंद्रांवरील रोजगारनिर्मिती ही स्वतंत्रपणे राबवली जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. अ‍ॅमेझॉन इंडियाच्या कस्टमर फुलफिलमेंट विभागाचे अध्यक्ष अखिल सक्सेना यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

Leave a Comment