चोहीकडे मोर आणि हिरवेगार शिवार असलेली मोराची चिंचोली


मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहेच पण तो देखणा पक्षीही आहे. दिल्ली, राजस्थान राज्यात मोर खूप संख्येने आहेत मात्र महाराष्ट्रात तुलनेने मोर फार कमी प्रमाणात दिसतात. खूप संख्येने, अगदी जिवगल मित्राप्रमाणे आपल्या जवळ येणारे, आपल्या हातून दाणे खाणारे मोर अनुभवायचे असतील तर पुणे जिल्ह्यातील शिरूरपासून २० किमीवर असलेल्या मोराची चिंचोली गावाला जरूर भेट द्यायला हवी. मोर प्रेमींसाठी हे पर्यटन स्थळ खूप लोकप्रिय आहेच पण या गावाची कीर्ती देश विदेशातही पसरली आहे. त्यामुळे दरवर्षी साधारण ३० ते ४० हजार पर्यटक या गावाला भेट देतात.

या छोट्याशा व एकेकाळी पाण्याचे तसेच रोजगार संधीचे दुर्भिक्ष्य असलेल्या गावाने स्वतःचा कायापालट केला असून तो ही समजावून घेण्यासारखा आहे. कृषी पर्यटनाने या गावचे रूपडे पालटविले आहेच पण कामधंद्यासाठी या गावातून स्थलांतर करून जाणार्‍यांचे प्रमाणही प्रचंड प्रमाणात कमी केले आहे. इतकेच नाही तर पूर्वी गाव सोडून गेलेलेही परत गावी परतू लागले आहेत.

गेल्या २० वर्षांच्या पद्धतशीर प्रयत्नातून गावाने आपले रूप पालटविले आहे. २० वर्षांपूर्वीच पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या या गावात जलसंधारणाची कामे गावकर्यपयांनी हाती घेतली. डोंगर उतारांवर गवताची कुरणे लावली व नदीत बांध घालून जागोजागी पाणी अडविले. गवतामुळे जमिनीची धूप थांबली तसेच पाणी अडविल्यामुळे विहीरींची पाणीपातळी वाढली. त्यानंतर गावकर्य यांनी मिश्र पिके घेण्याची सुरवात केली त्याचबरोबर मोर पाहण्यासाठी येणारे पर्यटक अधिक प्रमाणात यावेत यासाठी कृषी पर्यटन सुरू केले. त्या अंतर्गत शेतातील मुक्काम, बैलगाडी सफर, उंटाची सवारी, ट्रॅक्टर सवारी तसेच शेतात पिक लागवडीचा अनुभव घेण्याची संधी पर्यटकांनी दिली. चवदार गावरान भोजन व मोर पाहण्यासाठी खास सुविधा दिल्याने येथे पर्यटकांनी संख्या वाढली आहे व त्यातून ८०० ते १ हजार जणांना रोजगार मिळाला आहे.

शेतीला पुरक म्हणून कोंबडी पालन व पशुपालनही केले जात आहे. यामुळे गावाची आर्थिक स्थिती सुधारली असून आज गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे वाहन आहे. या गावात आज मितीला १० कृषी पर्यटन केंद्रे आहेत व भारत पर्यटन तसेच महाराष्ट्र पर्यटन विभागचे अनेक पर्यटन पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

———

Leave a Comment