इन्फोसिस देणार दहा हजार अमेरिकनांना नोकऱ्या


ट्रम्प यांच्या कडक धोरणाचा परिणाम

न्यूयॉर्क: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘एच १ – बी’ व्हिसाच्या बाबतीत भारतीय कंपन्यांच्या नाड्या आवळल्याचा परिणाम म्हणून ‘इन्फोसिस’ या भारतातील आघाडीच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने अमेरिकेतील १० हजार युवकांना मोकळया देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अमेरिकेत ४ तंत्रज्ञान केंद्रही कंपनी उभारणार असून त्यापैकी पहिले केंद्र इंडियाना येथे ऑगस्टमध्ये सुरू होत आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी सत्तेवर येण्यापूर्वीच भारतासह अनेक देशांतील तंत्रज्ञ अमेरिकन युवकांच्या नोकऱ्या पळवीत असल्याचा मुद्दा प्रचारात आणून आपण सत्तेवर आल्यास त्याला आळा घालून अमेरिकन युवकांना अधिकाधिक नोकऱ्या मिळाव्या; यासाठी उपपयोजना करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी सत्तारूढ होताच त्यांनी तात्पुरत्या व्हिसावर अमेरिकेत येऊन काम करण्याच्या तरतुदीवर निर्बंध आणले.

ट्रम्प यांच्या या धोरणाचा मोठा परिणाम भारतीय आयटी कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर झाला आहे. ट्रम्प यांनी एवढ्यावरच न थांबता आपल्या तंत्रज्ञांना अमेरिकेत आणण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब करीत असल्याचा आरोप इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अशा आघाडीच्या भारतीय कंपन्यांवर करून त्यांना ‘राजकीय लक्ष्य’ केले आहे.

ट्रम्प यांच्या या आक्रमक धोरणाचा परिणाम म्हणून भारतीय कंपन्यांना अमेरिकेत व्यवसाय करायचा असेल; तर अमेरिकन युवकांना नोकऱ्या देण्याशिवाय पर्याय नाही; अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. इन्फोसिसच्या निर्णयामुळे त्यावर शिक्का मोर्तब झाले आहे. ‘कंपनीने यापूर्वीच सन २०१४ मध्ये अंगीकारलेल्या धोरणानुसार २ हजार अमेरिकन कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. या पुढे २ वर्षात विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता विकासासारख्या क्षेत्रात अमेरिकेतील १० हजार जणांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जातील; असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांनी स्पष्ट केले. अमेरिकेच्या दृष्टीने विचार करता; त्यांच्या युवकांना अधिक रोजगार आणि संधी उपलब्ध करून देण्याचे सरकारचे धोरण योग्यच म्हटले पाहिजे; असेही ते म्हणाले.

Leave a Comment