मडिकेरी- भारताचे स्कॉटलंड


सुंदर निसर्ग, कोसळणारे धबधबे, उन्हाळ्यात थंडावा, थंडीत धुक्याची चादर पांघरणारे कर्नाटकातील हिल स्टेशन मडिकेरी आवर्जून भेट द्यावी असे पर्यटनस्थळ आहे. भारताचे स्कॉटलंड अशी त्याची ओळख आहे. चहूबाजूंनी पसरलेले कॉफी प्लांटेशन या ठिकाणाच्या सौंदर्यात अधिक भर घालतेच पण भारतीय लष्कराला अनेक जाँबाज अधिकारी आणि जवान देण्याची कामगिरीही या छोट्याशा सुंदर ठिकाणाने बजावली आहे ही अवघ्या भारतवर्षासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

मंगलोरपासून तीन तासांच्या अंतरावर असलेल्या कुर्गपासून येथे जाता येते. हा रस्ताच इतका सुंदर आहे की मडीकेरीला पोहोचण्याअगोदरच पर्यटक तिच्या प्रेमात पडतात. समुद्रसपाटीपासून ११६६ मीटर उंचीवर असल्याने उन्हाळ्यात ते थंड हवेचे ठिकाण ठरते तरी कोणत्याही सिझनमध्ये येथे जाता येते कारण प्रत्येक सीझनला येथील निसर्ग नवनवी रूपे धारण करत असतो. कॉफी प्लांटेशनच्या पार्श्वभूमीवर दिसणारे सुंदर पहाड, धोधो कोसळणारे धबधबे, अनेक झरे व थंडीच्या दिवसांत हॉटेल रूम्समध्ये अलगद घुसणारे धुके व विविध पक्ष्यांच्या किलबिलाटाने येणारी जाग हा अनुभव घ्यायलाच हवा असा. सायंकाळी टाऊन मॉलवर चक्कर मारली तर स्थानिक गर्दी व त्यांची संस्कृती पाहता येते.


ट्रेकर्सप्रेमींसाठी हे ठिकाण उत्तम आहे कारण येथे ३३ टक्के जंगल आहे. येथे भारतात सापडणार्‍या फुलांपैकी ८ टक्के जाती दिसतात तर अस्वले, सांबार, चारशिगे, हत्ती, रानमांजरे असे वन्य पशुही पाहता येतात. नागरहोल वन्यप्राणी अभयारण्य येथून जवळ आहे. खुद्द मडिकेरीत ओंकारनाथ मंदिर पाहण्यायेाग्य आहे. लिंगराजेंद्र दोन याने कॅथलिक, केरळी, गॉथिक व इस्लामी वास्तूशैलीचा वापर करून हे सुंदर मंदिर बांधले आहे. मडिकेरीच्या किल्यातील महालही भेट द्यावी असा. सूर्योदय व सूर्यास्ताचा मस्त नजारा दाखविणारी राजाची सीट नजर खिळवून ठेवणारी. येथून उंच पहाड, हिरव्यागार दर्‍याखोर्‍या व भातशेती पाहताना डोळे निवून जातात.

Leave a Comment