एअरटेलने सुरु केली इंटरनेट टीव्ही सेवा


मुंबई : आपल्या इंटरनेट टीव्ही सेवेची घोषणा एअरटेलने केली असून, सेट टॉप बॉक्सच्या मदतीने या नव्या सेवेत ५०० पेक्षा जास्त सॅटेलाईट चॅनेल्स उपलब्ध होणार आहेत. तसेच या सेवेतून तुम्हाला नेटफ्लिक्स, यूट्यूब, गूगल प्ले गेम्सचा आनंद टीव्हीवर घेता येणार आहे. या नव्या सेवेसाठी तुम्हाला डिशची गरज भासणार नाही.

याबाबत अधिक माहिती देताना भारती एअरटेलचे सीईओ आणि संचालक सुनील तालदार यांनी सांगितले की, देशभरात सध्या ३२ इंचापेक्षा मोठ्या स्क्रिनचे जवळपास तीन कोटी टेलिव्हीजन सेट आहेत. यापैकी एक कोटी ग्राहक स्मार्ट टीव्हीचा वापर करतात. एअरटेलच्या या नव्या सेवेत सेट टॉप बॉक्सच्या मदतीने उर्वरित टीव्हीदेखील स्मार्ट होऊ शकतील.

तालदार पुढे म्हणाले की, एअरटेलच्या सेट टॉप बॉक्सच्या सबस्क्रिप्शनसाठी वर्षाला तुम्हाला ७९९९ रुपये मोजावे लागतील. तर एका महिन्याच्या सबस्क्रिप्शनसाठी ७०० रुपये द्यावे लागतील. तसेच जुन्या सव्वा कोटी डीटीएच ग्राहकांना ३९९९ रुपये खर्च करुन, नवा सेट टॉप बॉक्स बसवता येईल. यात त्यांना एक महिन्याचे सबस्क्रिप्शन मिळेल.

वायफायच्या माध्यमातून या नव्या सेट टॉप बॉक्सवर इंटरनेटची सुविधा उपलब्ध होईल. तुमच्याकडे या वायफाय सेवेसाठी एअरटेलचे इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे नाही. पण जर तुमच्याकडे एअरटलेचे इंटरनेट कनेक्शन असेल, आणि तुम्ही ९९९ पेक्षा अधिकचे पॅकेज वापरत असाल, तर तुम्हाला इंटरनेट टीव्हीसाठी २५ जीबीचा अतिरिक्त डेटा मोफत मिळेल. एअरटेलचे इंटरनेट कनेक्शन तुमच्याकडे नसेल, तर तुम्ही दुसऱ्या कंपनीच्या इंटरनेट सेवेचाही वापर करु शकता. पण केवळ त्या कंपनीचा इंटरनेट स्पीड ४ एमबीपीएस असणे गरजेचे आहे.

लाईव्ह टीव्ही तुम्हाला या नव्या सेट टॉप बॉक्सच्या माध्यमातून वेगळ्या अंदाजात पाहता येईल. यात तुम्ही लाईव्ह टीव्हीला पॉज करुन पाहता येईल. तसेच रिवाईंड आणि रेकॉर्डसारखे पर्याय यात उपलब्ध आहेत. शिवाय, बॉक्समधील ब्लू टूथच्या माध्यमातून मोबाईल, टॅबलेट किंवा लॅपटॉपवरील कंटेट टीव्हीवर पाहू शकता. तसेच गेम डाऊनलोड करुन कंसोलच्या मदतीने खेळू शकाल.

बाजारात एअरटेलची ही नवी सुविधा नवा ट्रेंड आणू शकते. दुसरीकडे रिलायन्स जिओदेखील आपली इंटरनेट टीव्ही सुरु करण्याच्या तयारीत असून नव्या सुविधांसह जिओची ही नवी सेवा बाजारात उतरेल, असा बाजारपेठेतील सूत्रांचे मत आहे. जिओच्या टीव्ही सेवेलाही महिन्याच्या पॅकेजचे दर अतिशय कमी असतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment