गंगोत्री जमुनोत्री यात्रा सुरू


उत्तराखंडमधील चारधाम यात्रेची सुरवात अक्षयतृतीयेपासून झाली असून या दिवशी गंगोत्री व जमुनोत्री या मंदिरांचे दरवाजे खुले झाले आहेत. पारंपारिक पद्धतीने साजर्‍या केल्या जाणार्‍या या सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या चारधाम यात्रेतील केदारनाथ मंदिर ३ मे रोजी तर बद्रीनाथ मंदिर ६ मे रेाजी उघडले जाणार आहे.

शीतकाळासाठी ही मंदिरे चार महिने बंद असतात. ही मंदिरे बंद करतानाही पारंपारिक सोहळा केला जातो. या काळात हा सर्व परिसर बर्फाच्छादित असतो. अक्षयतृतीयेला गंगोत्री व जमुनोत्री मंदिरांचे दरवाजे उघडले जातात. गंगामातेची पालखी काल सकाळी साडेनऊच्या सुमारास गंगेचे माहेर समजल्या जाणार्‍या मुखबा येथून आणली गेली. यावेळी लष्कराचा बँड वाजत होता व मंत्रघोषात पालखीचे पुरोहितांनी स्वागत केले. त्यानंतर मूर्तीच्या शृंगार व पूजा केली गेली.

यमुनोत्री मंदिरातही याच पारंपारिक पद्धतीने देवीची मूर्ती स्थापन केली गेली. या दोन्ही ठिकाणी भाविकांची खूप गर्दी जमली होती. हिमालयाच्या गढवाल मधील ही चारधाम यात्रा आता अधिकृतपणे सुरू झाली असून ती आक्टोबर पर्यंत सुरू राहील.

Leave a Comment