नाशिकच्या वृंदाने जेईई मेन्समध्ये फडकवला मराठी झेंडा


नाशिक: जेईई मेन्स परिक्षेही आपला आवाज देशातील विविध परिक्षांमध्ये अव्वल असलेल्या महाराष्ट्राने कायम राखला असून नाशिकच्या वृंदा नंदकुमार राठी या विद्यार्थीनेने जेईई मेन्स परिक्षेत बाजी मारत मराठी झेंडा फडकवला आहे. जेईई परिक्षेत वृंदा राठी ही विद्यार्थीनी मुलींमध्ये देशात पहिली आली आहे. जेईईही अभियांत्रीकीसाठीची सर्वात महत्त्वाची आणि तितकीच कठीण परीक्षा म्हणून ओळखली जाते. यंदा १३ लाख विद्यार्थी या परिक्षेसाठी बसले होते. ३२१ गुण मिळवत वृंदाने देशात पहिले स्थान पटकावले.

यापूर्वीही वृंदाची शैक्षणिक कारकिर्द अशीच दैदीप्यमान राहीली आहे. वृंदाने दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवत उच्चांक नोंदववला होता. ती नाशिक रोडवरील सेंट झेव्हिअर्स हायस्कूलची विद्यार्थीनी असून, पंचवटी महाविद्यालयातून तिने बारावीची परिक्षा दिली आहे. आयआयटी परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन अभियांत्रिकी क्षेत्रात संशोधन करण्याचा वृंदाचा मानस आहे.

वृंदाला अभियांत्रिकीचा वारसा तिच्या घरातूनच मिळाला आहे. वृंदाचे वडील हे पेशाने प्रॉडक्शन इंजिनीअर असून, ते एनआयटी सुरतमधून पदवीधर झाले आहेत. एनआयटीमधून पदवी घेतल्यावर त्यांनी अल्पावधितच स्वत:चा व्यवसाय सुरू केला. सिन्नर औद्योगिक वसाहतीत त्यांचा सध्या स्वत:चा लघुउद्योग आहे. वृंदाची आई कृष्णा राठीही स्वत: आर्किटेक्ट आहेत. त्यांनीही एनआयटी नागपूर येथून आर्किटेक्टची पदवी घेतली असून एनआयटी अहमदाबाद येथून पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.

आयआयटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) ही देशातील अव्वल क्रमांकाची इंजिनिअरिंग संस्था आहे. या संस्थेत प्रवेश देण्यासाठी जेईई मेन्स ही परिक्षा तीन टप्प्यांमध्ये घेण्यात आली होती. अनुक्रमे २, ४ आणि ९ एप्रिलला ही परीक्षा पार पडली होती. देशभरातील एकुण १३ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मेरीटनुसार दोन लाख विद्यार्थी एडलान्स आणि पात्र ठरतील. या विद्यार्थ्यांमधूनच देशभरातील विविध आयआयटी महाविद्यालयांमध्ये सुमारे १३ हजार विद्यार्थ्यांना यावर्षी प्रवेश मिळणार आहे.

Leave a Comment