नव्या नोटांचा साठा नोटाबंदीच्या घोषणेआधीच होता तयार


नवी दिल्ली – मागील वर्षी ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यावर देशभरात चलनकल्लोळ निर्माण झाला होता. पण पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांचा पुरेसा साठा पंतप्रधान मोदींच्या निर्णयाआधी तयार होता, अशी माहिती रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी दिली आहे. उर्जित पटेल यांनी नोटाबंदीच्या निर्णयाची घोषणा होण्याआधीच नव्या नोटा छापून तयार ठेवण्यात आल्या होत्या, असे संसदेच्या स्थायी समितीला सांगितले. रिझर्व्ह बँक आणि सरकार यांच्यात नोटाबंदीवर झालेल्या चर्चेची कोणतीही नोंद गोपनीयतेच्या कारणास्तव ठेवण्यात आली नाही, असेदेखील उर्जित पटेल यांनी संसदेच्या स्थायी समितीला सांगितले.

नोटाबंदीचा निर्णय बोगस नोटांच्या सुळसुळाटाला पायबंद घालण्यासाठी घेण्यात आला. रिझर्व्ह बँकेकडून ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात आल्याचे उर्जित पटेल यांनी संसदेच्या स्थायी समितीला सांगितले. यासोबतच जनतेला कमीत कमी त्रास व्हावी, याची योग्य ती काळजी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, असेही पटेल यांनी सांगितले.

वेळोवेळी चलन छपाई करणारी यंत्रे, आवश्यक संसाधने, चलन छपाईसाठी आवश्यक असणारी शाई, कागद यांची उपलब्धता यासारख्या महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा करण्यात आली होती. पुरेशा प्रमाणात नव्या नोटा छापून तयार ठेवण्यात आल्या होत्या. ५०० आणि २००० हजारांच्या नव्या नोटांच्या छपाईचे काम नोटाबंदीचा निर्णय जाहीर होण्याच्या काही महिन्यांपूर्वीपासूनच सुरु करण्यात आले होते. नोटाबंदीनंतरच्या निर्णयानंतर निर्माण होणारी स्थिती लक्षात घेता नव्या नोटांची छपाई आधीच सुरु करण्यात आली होती, अशी माहिती उर्जित पटेल यांनी संसदेच्या स्थायी समितीसमोर दिली.

Leave a Comment