‘कॅसिनी’ने टिपले शनी ग्रहाचे अंतरंग


केप कॅनव्हेरल : शनी ग्रहाच्या पहिल्या विवरात अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने पाठविलेल्या कॅसिनी या अंतराळयानाने यशस्वीपणे प्रवेश केला असून, शनीची सर्वांत जवळून टिपलेली छायाचित्रे गुरुवारी तेथून पाठविण्यात आली आहेत.

‘कॅसिनी’ या अंतराळयानातून पृथ्वीवर शनीवर फिरणारे ढग, अतिशय मोठी वादळ आणि हवामानाची असाधारण अशी षटकोनी रचना यांची साक्ष देणारी छायाचित्रे पाठविण्यात आली आहेत. गेल्या १३ वर्षांपासून शनी ग्रहाबाबत ‘कॅसिनी’च्या माध्यमातून संशोधन करण्यात येत आहे.

‘कॅसिनी’चा हा शनीभोवतीचा अंतिम टप्पा आहे. शनी ग्रहाभोवती वर्तुळाकार कड्या आहेत. अवकाशात त्या अंगठीप्रमाणे दिसतात. शनी आणि त्यातील सर्वांत अंतर्गत कड्यांमधील अरुंद जागेतून बुधवारी कॅसिनी गेले. आतापर्यंत कोणतेही यान एवढ्या जवळ गेलेले नव्हते. बुधवारी ही कामगिरी कॅसिनीने केली. अशा प्रकारची कामगिरी २२ वेळा करण्याची योजना आहे. त्याद्वारे शनीवरील ढग आणि तेथील विवरे यांच्यातील अज्ञात भागावर रोबोटिक संशोधन करण्यात येणार आहे, ‘नासा’ने सांगितले.

Leave a Comment