आगामी पाच वर्षांत भारताची अर्थव्यवस्था बनेल ‘बाहुबली’


नवी दिल्ली: येत्या पाच वर्षांत विकसित जर्मनीला मागे टाकत वेगवान अर्थव्यवस्था असणारा भारत देश जगातील आघाडीच्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये स्थान पटकावेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्तविला आहे.

पण याआधी देशाला काही महत्त्वपूर्ण आव्हाने पार करावी लागतील, असेही संस्थेने स्पष्ट केले असून सध्या जगातील आघाडीच्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये अमेरिका, चीन, जपान, जर्मनी आणि ब्रिटनचा समावेश आहे. या यादीत भारताला स्थान मिळाल्यानंतर ब्रिटन या यादीतून बाहेर पडेल.

आयएमएफच्या अहवालात भारतासमोरील आव्हानांविषयी म्हटले आहे की, यामध्ये करप्रणालीत सुधारणा घडवून आणणे, अनुत्पादित कर्जांचा डोंगर कमी करणे, कमी झालेली उत्पादकता वाढविणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे, तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील गुंतवणूकीला प्रोत्साहन देणे आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील गुंतवणूक वाढविणे याचा समावेश आहे.

कर सुधारणांबाबत सरकारने चांगली प्रगती केली असून देशाच्या दीर्घकालीन प्रगतीसाठी हे निर्णय दीर्घकालीन प्रगतीसाठी फायदेशीकर ठरतील. जीएसटीच्या अंमलबजावणीचा देशाला फायदा होणार असून व्यापार वाढीस लागेल’, असे ‘आयएमएफ’चे उप-व्यवस्थापकीय संचालक टाओ झँग म्हणाले.

त्याचबरोबर ‘आयएमएफ’ने गेल्या काही वर्षांमध्ये भारताने मजबूत आणि स्थिर वेगाने विकास केल्याचेही मान्य केले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे देशात गांभीर्याने हाती घेण्यात आलेल्या सुधारणा आणि अनुकूल व्यापार अटींसोबत बाह्य घटनांचा कमी परिणाम असे आहे. याशिवाय चालू आर्थिक वर्षात (२०१६-१७) देशाचा विकास दर ६.८ टक्के राहणार असून त्यापुढील आर्थिक वर्षात (२०१७-१८) हे प्रमाण ७.२ टक्के असेल, असा अंदाजही ‘आयएमएफ’ने व्यक्त केला आहे.

Leave a Comment