हे महाबली फोडतात नारळ, देतात प्रसाद


महाबली हनुमानासंबंधी अनेक कथा, आख्यायिका आहेत व त्यात त्यांनी केलेले अनेकविध चमत्कारांचे वर्णनही आहे. भारतात हनुमानाची मंदिरे सर्वाधिक संख्येने आहेत व करोडो भाविकांचे हनुमान हे आराध्य दैवत आहे. भारतात एकूणच मंदिरे, देवळे, त्यातील देवदेवता व त्यांचे चमत्कार यांच्या लक्षावधी कथा सांगितल्या जातात. अहमदाबादजवळच्या सारंगपूर येथील हनुमान मंदिरही असेच चमत्कारी आहे. हा चमत्कार पाहण्यसाठी दूरदूरच्या ठिकाणाहून भाविक येथे येत असतात.

हिंदू भाविक जेव्हा मंदिरात जातात, तेव्हा देवासमोर नारळ फोडून त्याचा प्रसाद घेण्याची प्रथा आहे. सारंगपूरच्या हनुमान मंदिरात पुजारी अथवा भाविकांना देवासाठी नेलेला नारळ स्वतः फोडावा लागत नाही कारण येथे खुद्द हनुमानच नारळ फोडतात व त्यातील एक भक्कल प्रसाद म्हणून भाविकांना देतात. अर्थात या चमत्कारामागे तंत्रज्ञानाचा हात आहे. म्हणजे देवळात नारळ फोडल्यामुळे होणारी घाण किंवा चिकटपणा राहू नये म्हणून येथील मंदिराने हनुमानाच्या मूर्तीच्या आत एक मशीन बसविले आहे. भाविकांनी हनुमानाच्या मुखातून नारळ आत टाकायचा की हनुमान मूर्तीच्या आत असलेले मशीन तो नारळ फोडते व हनुमानाच्या हातातून प्रसादाचे खोबरे बाहेर टाकले जाते. या युक्तीमुळे या मंदिराचे प्रांगण स्वच्छ व सुंदर राहिले आहे.

Leave a Comment