पॅनकार्ड हे आधारकार्डसोबत लिंक करा; नाहीतर करावा लागेल पश्चाताप


नवी दिल्ली – केंद्र सरकारने देशभरातील नागरिकांना १ जुलै २०१७ पर्यंत पॅनकार्ड हे आधारकार्डसोबत लिंक करण्याचे आदेश दिले असून १ जुलैपर्यंत जर आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक झाले नाही तर तुमचे पॅनकार्ड रिजेक्ट होऊ शकते. तुम्ही अशा स्थितीत चालू आर्थिक वर्षात इन्कम टॅक्‍स रिटर्न भरू शकणार नाहीत. कारण, इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी पॅनकार्ड आणि आधार नंबर हे दोन्ही अनिवार्य करण्यात आले आहे.

अनेक व्यक्तींना आधारकार्डाशी पॅनकार्ड लिंक करण्यात अडचण निर्माण होत आहे. ज्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये काही चुका आहेत त्यांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. पॅनकार्डवरील नावाचे स्पेलिंग आधारकार्डावरील नावाचे स्पेलिंगशी जुळले नाही तर असे कार्ड लिंक होत नाही. बँक खात्यातील नावाचे स्पेलिंग आणि आधारकार्डावरील नावाचे स्पेलिंग यात साम्य नसेल तर आधार आणि पॅन कार्ड लिंक होणार नाही.

पॅनकार्ड आणि आधार कार्ड यांमधील नावाच्या स्पेलिंगमध्ये चुका असल्यास तुम्ही आपल्या पॅनकार्ड आणि आधारकार्डात बदल करण्यासाठी अर्ज करू शकता. हा अर्ज इन्कम टॅक्स खात्याच्या वेबसाईटवर दिलेल्या लिंकवर करता येणार आहे. आधार कार्डातील माहितीतील बदल करण्यासाठी यूआयडीला आवश्‍यक कागदपत्रांसह अर्ज करावा लागेल. आयकर विभागाच्या नियमानुसार, एनआरआय व्यक्तींना देशात टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आधार कार्डची सक्ती नाही.

Leave a Comment