जीएसटीमुळे आयफोनप्रेमींचा होणार हिरमोड


नवी दिल्ली: देशात जीएसटी कायदा १ मे पासून अमलात येणार असून अनेक प्रॉडक्टला त्याचा फटका बसणार आहे, परिणामी तुमचा खिसा काही प्रमाणात हलका होणार आहे. ‘इम्पोर्टेटड’ मोबाइल फोनवर सरकार सीमा शुल्क लागू करण्याची दाट शक्यता असून सरकार असा निर्णय देशातील मोबाइल फोन निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी घेणार असल्यामुळे इम्पोर्टेड म्हणजे आयात स्मार्टफोनच्या किमतीत ५ ते १० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.

आयात मोबाइल फोनवर सीमा शुल्क लागू करण्याबाबत तज्ज्ञांचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने कायदेशीर मत मागवून घेतले आहे. कारण आयात स्मार्टफोनवर सीमा शुल्क आकारल्यास इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी अँग्रीमेंट (आयटीए) या आंतरराष्ट्रीय कराराचा भंग होऊ शकतो. या करारानुसार करारावर स्वाक्षर्‍या करणार्‍या देशांमध्ये काही इलेक्ट्रॉनिक उत्पादने नि:शुल्क आयात करण्याची मुभा आहे.

स्मार्टफोनची प्रचंड मोठी बाजारपेठ भारतात असून दिवसागणिक ती वाढतच आहे. अमेरिकेपेक्षाही अधिक स्मार्टफोन सध्या भारतात विकले जात आहेत; पण बहुतांश स्मार्टफोन आयात झालेलेच असतात. मोदी सरकारने ‘मेक इन इंडिया’ धोरण राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, आता भारतीय मोबाइल उद्योगाला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकार सीमा शुल्क आकारण्याची चाचपणी करत आहे.

Leave a Comment