सुट्ट्यांना कात्री


उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्य सरकारच्या अखत्यारित दिल्या जाणार्‍या ४५ सार्वजनिक सुट्ट्यांना सुट्टी देऊन टाकली आहे. एकामागे एक धक्कादायक निर्णय घेण्याच्या मालिकेतला त्यांचा हा निर्णय लोकांनाही आवडला आहे. कारण उत्तर प्रदेशामध्ये सरकारी कर्मचारी आणि विद्यार्थी यांना दिल्या जाणार्‍या सुट्ट्यांच्या बाबतीत अतिरेक झाला होता. सुट्ट्या एवढ्या जास्त झाल्या होत्या की कामाचे दिवस किती शिल्लक राहतील असा प्रश्‍न निर्माण झाला होता. उत्तर प्रदेशात सगळे मिळून वर्षात १२० कामाचे उरले होते. जयंत्या आणि पुण्यतिथ्या यांच्या निमित्ताने ४२ सुट्ट्या दिल्या गेल्या होत्या. मायावती आणि अखिलेश यादव यांनी या सुट्ट्या वाढवलेल्या होत्या.

त्यांची छाननी करून आदित्यनाथ यांनी त्यातल्या १५ सुट्ट्या कमी केल्या आहेत. या सगळ्या सुट्ट्या पाहिल्या म्हणजे अखिलेश यादव आणि मायावती यांनी सार्वजनिक सुट्ट्यांचेसुध्दा कसे राजकारण केले होते आणि मतपेढ्यांचे राजकारण करण्यासाठी या सुट्ट्या दिलेल्या होत्या हे लक्षात येते. उदा. उत्तर प्रदेशामध्ये कर्पुरी ठाकूर यांच्या जयंतीलाही सुट्टी होती. शिवाय माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या जयंतीला १७ एप्रिलला सुट्टी होती. चंद्रशेखर यांच्याबरोबरच चौधरी चरणसिंग यांच्याही जयंतीची सुट्टी दिली जात होती. वास्तविक पाहता कर्पुरी ठाकूर हे बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या जयंतीला बिहारमध्ये सुट्टी नाही पण उत्तर प्रदेशात ती होती. त्याशिवाय महर्षी कश्यप, महाराज गुहा, निशाद राज, महाराणा प्रताप, छटपूजा, आंबेडकर पुण्यतिथी अशाही अन्य राज्यात नसलेल्या अनेक सुट्ट्या उत्तर प्रदेशात जाहीरर झालेल्या होत्या.

योगी आदित्यनाथांनी या सुट्ट्या रद्द करताना त्या त्या महापुरुषांचा अपमान केलेला नाही. खरे म्हणजे त्या महापुरुषांनासुध्दा त्यांच्या जयंतीची किंवा पुण्यतिथीची सुट्टी देणे आवडले नसते. आदित्यनाथ यांनी या सुट्ट्या रद्द करताना त्या दिवशी शाळांमध्ये दोन तास सुट्टी देऊन त्या महापुरुषांची माहिती मुलांना द्यावी असे आपल्या आदेशात म्हटले आहे. म्हणजे उलट त्यांनी या महापुरूषांची जयंती अधिक विधायकपणे साजरी करण्याची सोय केलेली आहे. आता शाळांमधील शिक्षकांची पंचाईत होईल. कारण आपण ज्यांच्या जयंतीची सुट्टी घेत होतो ते नेमके कोण होते हे कित्येक शिक्षकांना माहीत नव्हते. ते सुट्टी मिळाल्याच्या आनंदात मग्न होते पण आता त्यांना ते महापुरुष कोण होते हे माहीत करून घ्यावे लागणार आहे आणि ती माहिती मुलांना द्यावी लागणार आहे.

Leave a Comment