पराभव आणि राजीनामा


दिल्ली महानगरपालिकेमध्ये आम आदमी पार्टीचा सपाटून पराभव झाला. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीने केली. खरे म्हणजे महापालिकेतील पराभव आणि मुख्यमंत्रीपद यांचा थेट काही संबंध नाही. परंतु भारतीय जनता पार्टीने तशी मागणी केलीच. तेव्हा आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी त्यांना जशाच तसे उत्तर दिले. दिल्ली विधानसभेची निवडणूक २०१५ साली झाली तेव्हा पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी आरूढ होते. त्यावेळी विधानसभेच्या ७० जागांपैकी ६७ जागा आम आदमी पार्टीने जिंकल्या आणि भाजपाला केवळ ३ जागा मिळून भाजपाचा सपाटून पराभव झाला. आता अरविंद केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा भाजपाचे नते ज्या न्यायाने मागत आहेत तोच न्याय त्यावेळी मोदींना लावला असता तर त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यायला हवा होता.

याची आठवण आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी करून दिली. ज्या अर्थी मोदींनी त्या पराभवानंतर पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला नाही त्या अर्थी आता केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा काही प्रश्‍नच निर्माण होत नाही असे उत्तर त्यांनी भाजपाला दिले आणि ते एका अर्थी बिनतोड होते. हे उत्तर बिनतोड असल्याचे आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना वाटत असले तरी आता केजरीवाल यांचा राजीनामा मागण्यामागे एक वेगळी वैचारिक भूमिका आहे आणि ती समजून घेतली पाहिजे. २०१५ च्या आधी २०१३ साली दिल्ली विधानसभेची निवडणूक झाली होती. त्यावेळी भाजपाला ३१ आणि आम आदमी पार्टीला २८ जागा मिळाल्या होत्या. तेव्हा कॉंग्रेसच्या छुप्या पाठिंब्याने केजरीवाल ४९ दिवस मुख्यमंत्री राहिले होते.

या काळात त्यांनी जनतेला काही अफाट आश्‍वासने दिली. त्यामुळे ४९ दिवसांनी विधानसभा बरखास्त होऊन नंतर १५ साली निवडणूक झाली. तेव्हा लोकांनी या आश्‍वासनामुळेच आम आदमी पार्टीला ७० पैकी ६७ जागा दिल्या. त्या आश्‍वासनांमध्ये केजरीवाल यांनी एक आश्‍वासन दिलेेले होते एकदा एखादा आमदार किंवा नगरसेवक निवडून आला तर तो पाच वर्षे टिकलाच पाहिजे असे नाही. त्याचे काम लोकांना आवडले नाही तर त्याला पाच वर्षाच्या आधीच परत बोलावण्याचा अधिकार आपण जनतेला देणार आहोत असे त्यांनी म्हटले होते. आता ते विधानसभेवर निवडून आलेले आहेत. परंतु महापालिकेत त्यांना मिळालेला कौल हा जनतेला त्यांचा कारभार आवडलेला नाही असे सूचित करणारा आहे. त्यामुळे आपल्या त्या आश्‍वासनांची बूज राखून केजरीवाल यांनी राजीनामा द्यावा असे भाजपाचे म्हणणे आहे.

Leave a Comment