पुन्हा एकदा हिंदी विरोध


शिवसेना, द्रमुक, अकाली दल असे निव्वळ प्रादेशिक पक्ष नेहमीच राज्यातल्या जनतेच्या प्रादेशिक भावना भडकावून आपले राजकारण करत असतात. द्रमुक हा तर तामिळनाडूतला फार जुना प्रादेशिक पक्ष आहे. मात्र गेल्या पाच-सात वर्षांपासून त्या पक्षाची एवढी बदनामी झाली आहे की तो आता टिकतो की नाही असा प्रश्‍न पडला आहे. द्रमुक पक्षाचे नेते एम. करुणानिधी हे आता वृध्द झाले आहेत आणि सक्रीय राजकारणापासून दूर आहेत. दरम्यानच्या काळात जयललिता यांच्या अण्णा द्रमुक पक्षाचे वर्चस्व वाढल्यामुळे द्रमुकचा प्रभाव ओसरायला लागला आहे. त्याला पुन्हा बळ देण्यासाठी आता करुणानिधी यांचे चिरंजीव एम. के. स्टॅलिन यांनी हिंदी भाषेविरुध्दच्या तामिळनाडूतील जनतेच्या भावना भडकवण्याचा उद्योग सुरू केला आहे.

केंद्र सरकार दक्षिण भारतातल्या अहिंदी भाषक राज्यांवर हिंदी भाषा लादत असून भारताला हिंदीस्तान बनवण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे असा आरोप स्टॅलिन यांनी केला आहे. त्यालासुध्दा एक कारण आहे. केंद्र सरकारच्या गृहखात्याने नुकतेच हिंदीच्या वापरासंबंधी काही आदेश जारी केले आहेत. त्यानुसार रेल्वे स्थानकांवर हिंदी भाषेत उद्घोषणा करणे आवश्यक ठरवले गेले आहे. संसदेत सादर होणारी विधेयके हिंदी भाषेतूनसुध्दा सादर करावीत असेही केंद्राने आदेश दिले आहेत. एकंदरीत केंद्र सरकारने हिंदी भाषेच्या व्यापक वापरासाठी काही निर्णय घेतले आहेत. त्यांचाच धागा पकडून एम. के. स्टॅलिन हे केंद्र सरकारच्या विरोधात आघाडी उघडण्याचा प्रयत्न करत आहेत.

वास्तविक पाहता हा प्रयत्न हिंदी लादण्याचा नाही तर हिंदीच्या उत्थानाचा आहे. तामिळनाडूतल्या एखाद्या रेल्वे स्थानकावर तामिळ भाषेतली उद्घोषणा बंद करून ती हिंदीतून द्यावी असा आदेश दिल्यास ते हिंदीचे लादणे ठरेल पण सरकारने हिंदीचा वापर वाढवतानाच अन्य कोणत्याही प्रादेशिक भाषेवर अन्याय केलेला नाही. त्यामुळे या प्रयत्नाला हिंदी लादण्याचा प्रयत्न असे म्हणणे चुकीचे आहे. वास्तविक पाहता सरकारचा हा प्रयत्न १९६३ साली पारित झालेल्या संसदेतल्या एका ठरावानुसार चालू आहे. या ठरावातून निश्‍चित झालेल्या धोरणाचा दर दहा वर्षांनी आढावा घेतला जातो आणि हिंदीचा वापर वाढण्यासंबंधी करावयाच्या उपाययोजनांमध्ये काही दोष राहिले असतील तर ते दाखवून देऊन काही सूचना दिल्या जातात. त्यामध्ये काहीही नवीन नाही. तेव्हा स्टॅलिन यांचा हा आरोप म्हणजे हिंदी विरुध्द अहिंदी भाषक असाच संघर्ष उभा करण्यासाठी लावलेला आहे.

Leave a Comment