संशोधनाचा विषय


राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल सोलापुरात बोलताना भाजपाचे विविध निवडणुकांतील यश हा एक संशोधनाचा विषय असल्याचे म्हटले आहे. गेल्या दोन दिवसांत विविध पातळ्यांवर आणि व्यासपीठांवरून भाजपाचे यश आणि मोदी लाट यावर मोठी मार्मिक चर्चा झालेली आहे आणि त्या संबंधात काही निष्कर्ष काढून काही विधाने केली गेली आहेत. ती मोठी मननीय आहेत आणि सध्याच्या राजकारणातील विविध प्रवाहांवर प्रकाश टाकणारी आहेत. म्हणून त्यांची दखल घेण्याची गरज आहे. सोलापुरात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा जाहीर सत्कार झाला. त्या सत्कार समारंभातही त्यांना मोदींचा विषय टाळता आला नाही. त्यांनीसुध्दा मोदी लाट तीन वर्षे टिकल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केलेच पण ही लाट अजून काही दिवस टिकून नंतर ओसरेल असा दिलासा आपल्या कार्यकर्त्यांना दिला. त्यामुळे कार्यकर्त्यांचे समाधान झाले असेलच परंतु भारताच्या इतिहासात आजपर्यंत अनेक लाटा आल्या आणि गेल्या. मात्र त्यातल्या बहुतेक लाटा काही महिन्यात ओसरल्या पण मोदी लाट का ओसरत नाही याचे निश्‍चित निदान अजून तरी कोणाला झालेले नाही.

सुनील तटकरे यांनी हा संशोधनाचा विषय असल्याचे म्हटले आहे. तर माननीय उध्दव ठाकरे यांनी आपला निष्कर्षसुध्दा जाहीर केला आहे. त्यांच्या मते नरेंद्र आणि देवेंद्र हे दोघेही लोकांना जादूचे खेळ दाखवत आहेत. लोकांनाही ते बरे वाटत आहेत. म्हणून प्रामाणिकपणे कामे करणार्‍यांना सोडून लोक या दोघांच्या मागे लागले आहेत. लोक असे का बावचळले आहेत याचा शोध घेतला पाहिजे. असे म्हणत असतानाच उध्दव ठाकरे यांनी एक दिवस सगळेच लोक भाजपापासून दूर जातील अशा आशयाचे निदानही केले आहे. श्री. शरद पवार यांनी, मोदी लाट टिकण्याच्या कारणाचे निदान करताना, भाजपाशिवाय अन्य पक्ष म्हणावे तेवढे सक्षम नसल्यामुळे भाजपाची ही लाट शिल्लक असल्याचे म्हटले आहे. सुनील तटकरे यांनी तर हे सरकार इतके वाईट असतानाही त्याला सतत यश का मिळते हा संशोधनाचा विषय असल्याचे म्हटले आहे. हे सरकार वाईट आहे म्हणजे काय याचेही तपशील देण्यास तटकरे विसरलेले नाहीत. तटकरे आणि त्यांचे मित्र शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली जावी या मागणीसाठी संघर्ष यात्रा काढून शेतकर्‍यांमध्ये जागृती निर्माण करत आहेत परंतु सरकार कर्जमाफीची घोषणा करत नाही. त्यामुळे सरकारची शेतकरी विरोधी प्रतिमा निर्माण झालेली आहे. मग असे असतानाही सरकारला विविध निवडणुकांत चांगले यश मिळतेच कसे, असा त्यांचा सवाल आहे..

तुरीच्या खरेदीच्या बाबतीत किती प्रचंड गोंधळ चाललेला आहे असे असूनही सरकारला यश मिळते कसे हा संशोधनाचा विषय असल्याचे तटकरे यांचे म्हणणे आहे. या दोन गोष्टी त्यांना सतावत आहेत. वास्तविक पाहता कोणीतरी संघर्ष यात्रा काढली आणि चार शेतकर्‍यांसमोर एक जाहीर सभा घेऊन सरकारच्या नावाने खडे फोडले म्हणून सरकार शेतकरी विरोधी ठरत नसते हे तटकरे यांना कळायला पाहिजे. सरकारची ही शेतकरी विरोधी प्रतिमा तयार करणारे कोण आहेत यालाही महत्त्व आहे. ज्यांनी १५ वर्षे शेतकर्‍यांचे वाटोळे केले तेच लोक आता सरकारच्या नावाने खडे फोडत आहेत. त्यामुळे सरकारची प्रतिमा शेतकरी विरोधी होण्याऐवजी तटकरेंचीच प्रतिमा दांभिक अशी होत आहे. याचे भान त्यांना नाही. वृत्तपत्रात बातम्या छापून आणल्या आणि माध्यमामध्ये सरकारच्या नावाने कल्ला केला की सरकारची प्रतिमा डागाळते हा त्यांचा भ्रम आहे. तटकरे यांचे असे प्रयत्न सुरू असतानाच सरकार शेतकर्‍यांना कायमचे सक्षम करण्यासाठी पावले उचलत आहे हे लोकांना दिसतच आहे. परंतु तटकरेंना ते दिसत नाही म्हणून त्यांना हा संशोधनाचा विषय वाटतो.

महाराष्ट्रात सरकारने जलयुक्त शिवार योजना उत्तम प्रकारे राबवली असे प्रमाणपत्र खुद्द विरोधी नेतेच देत आहेत आणि कोणी प्रमाणपत्र दिले नाही तरी हजारो शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ होत आहे. त्यांना तरी सरकारची प्रतिमा सकारात्मक वाटत असणारच कारण त्यांचा तो अनुभव आहे. गेली १५-२० वर्षे महाराष्ट्रातली खेडी जलसंकटाने वरचेवर होरपळत गेली. त्यावर तटकरेंच्या सरकारने कसलीच उपाययोजना केली नाही आणि केलीच असेल तर ती वरवरची मलमपट्टी म्हणता येईल अशी केली. परंतु फडणवीस यांचे सरकार आमीर खान सारख्या लोकप्रिय चित्रपट अभिनेत्याला हाताशी धरून हजारो खेड्यांना पाण्याच्या बाबतीत स्वावलंबी बनवत आहे. हे लोकांना दिसतेच ना. सुनील तटकरे यांना काही संशोधन करायची हौसच असेल तर त्यांनी सरकारच्या प्रयत्नातून पाण्याबाबत स्वावलंबी होत असलेल्या खेड्यांचे संशोधन करावे. म्हणजे त्यांनाही काही बोध होईल आणि उध्दव ठाकरे यांनासुध्दा देवेंद्र आणि नरेंद्र मिळून कसले जादूचे खेळ करत आहेत हेही समजून येईल. तुरीच्या बाबतीत आरडाओरडा सुरू आहे परंतु गेली १५ वर्षे महाराष्ट्रात सत्ता असताना कॉंग्रेसच्या सरकारने खरेदी केलेली सर्वाधिक तूर २ लाख १५ हजार टन एवढी आहे पण आताच्या सरकारने ३८ लाख टन तूर खरेदी केलेली आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या तूर उत्पादकांना सरकारने न्याय दिलेला आहे. हा फरक सर्वांनीच लक्षात ठेवण्यासारखा आहे.

Leave a Comment