२८ तारखेला लाँच होणार नवाकोरा नोकिया ३३१०


नोकियाने काही दिवसांपूर्वी बार्सिलोनामध्ये पार पडलेल्या ‘मोबाइल वर्ल्ड काँग्रेस’मध्ये ‘३३१०’ पुन्हा आणण्याचा निर्णय जाहीर केला होता. हा मोबाइल जवळपास साडेतीन हजार रुपयांत नव्या रूपात, नव्या ढंगात पण जुनी ओळख घेऊन बाजारात दाखल होणार असल्याचे नोकियाने सांगितल्यानंतर हा फोन कधी येणार याची उत्सुकता अनेकांना होते. नोकिया सध्या टच स्क्रिन आणि स्मार्टफोनच्या जगात कधीच मागे पडली, पण याही काळात आपण कीपॅडवरच चालणार आहे आणि त्याची मजबुती आधीसारखीच असणार असल्याचे नोकियाने सांगून ३३१०च्या रिलाँचची घोषणा केली. एप्रिलमध्ये हा फोन लाँच होणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार जगभरात हा फोन येत्या शुक्रवारी म्हणजे २८ एप्रिलला लाँच होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. या फोनची जर्मनी तसेच ऑस्ट्रेलियासारख्या देशात प्रीबुकिंग देखील सुरू झाली आहे. तर जूनमध्ये हा फोन भारतात लाँच होणार आहे.

हा फोन सप्टेंबर २००० मध्ये लाँच करण्यात आला होता. त्यानंतर या फोनला जगभरात तुफान प्रसिद्धी लाभली होती. हा फोन ‘रफ अँड टफ युज’ आणि दीर्घ बॅटरी लाईफ या दोन कारणामुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरला होता. आता निळसर, लाल, पिवळा, राखाडी अशा रंगात हा फोन उपलब्ध होणार आहे. भारतीय बाजारपेठेत या फोनची किंमत ३ हजार ९०० रुपयांच्या आसपास असल्याचे बोलले जात आहे. हा फोन जगभरात येत्या २८ तारखेला लाँच होणार असून जून महिन्यापर्यंत या फोनसाठी भारतीयांना मात्र प्रतीक्षा करावी लागणार आहे.

नोकिया ३३१०मध्ये २.४ इंची आकाराचा रंगीत डिस्प्ले देण्यात आला असून सूर्यप्रकाशातही स्क्रीन स्पष्ट पाहता येईल, अशी रचना यात केली आहे. या फोनमध्ये दोन मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. सोबत एलईडी फ्लॅश देखील आहे, पण फ्रंट कॅमेरा मात्र यात नसणार. नोकियामध्ये उपलब्ध असलेला स्नेक गेमही यात आहे. चार बटणांवर तो खेळता येणार आहे. ‘स्नेक’ गेम नव्या ‘३३१०’ मध्ये अधिक आकर्षक रूपात असणार आहे. या फोनची बॅटरी लाईफ २२ तासांपर्यंत आहे, तर ‘स्टॅण्डबाय’ स्वरूपात हा फोन महिनाभर चार्जिंगशिवाय ग्राहकांना वापरता येणार आहे.

Leave a Comment