अमेरिकेची भरभराट ही केवळ जगभरातून आलेल्या कर्मचाऱ्यांमुळेच – उर्जित पटेल


न्यूयॉर्क – आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जर जगभरातून आलेल्या गुणवत्ताधारक कर्मचाऱ्यांनी अॅपल, आयबीएम सारख्या कंपन्यांमध्ये नोकरी केली नसती तर त्या कंपन्यांचे आज काय भवितव्य राहिले असे म्हणत अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला. सत्तेमध्ये येण्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन नागरिकालाच नोकरी द्या आणि अमेरिकन वस्तू खरेदी करा असा नारा दिला होता. अमेरिकेतील लोकांच्या नोकऱ्या बाहेरील देशातून आलेल्या लोकांनी हिरावून घेतल्या अशी ओरड ट्रम्प यांनी निवडणुकीआधी केली होती. त्यांनी निवडणूक जिंकल्यानंतर व्हिसावरील निर्बंध कठोर केले आहे. पटेल त्या पार्श्वभूमीवर कोलंबिया विद्यापीठाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

केवळ अमेरिकन लोकांमुळे नव्हे तर आंतरराष्ट्रीय व्यापाराची संधी अमेरिकेला उपलब्ध झाल्यामुळे अमेरिका आज श्रीमंत असल्याचे ते म्हणाले. सर्वांची प्रगती खुल्या व्यापारी धोरणामुळे होत असल्याचे ते म्हणाले. जगभरात अमेरिकेतील सर्वोत्तम ब्रॅंड्सच्या शाखा असल्यामुळे त्या कंपन्यांची शेअर बाजारातील किंमत अधिक असल्याचे ते म्हणाले. आज अमेरिकन कंपन्यांची भरभराट जगभरातून येणाऱ्या गुणवत्तापूर्ण वस्तू आणि कर्मचाऱ्यांमुळेच होत असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या भाषणानंतर त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांनी उत्तर दिली. कर्जमाफी, नोटाबंदी, जीएसटी, भारतीय बॅंक व्यवस्था रुपयाचे सशक्तीकरण या विषयांवर विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. नोटाबंदीनंतर भारताबाहेर राहणाऱ्या लोकांना पैसे बदलण्यास त्रास होत आहे यावर विचारले असता ते म्हणाले यासाठी आम्ही वेळेची मर्यादा निश्चित केली होती. ही कृती आरबीआय दीर्घकालासाठी करू शकत नाही असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment