सावरकर आणि भारतरत्न


स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनाविलंब भारतरत्न किताब देण्यात यावा अशी मागणी शिवसेनेचे नेते उध्दव ठाकरे यांनी केली आहे. सावरकरांना भारतरत्न, डॉ. भागवत यांना राष्ट्रपतीपद द्यावे तसेच बाबरी मशिदीच्या संदर्भात १३ हिंदुत्ववादी नेत्यांवर दाखल झालेले आरोपपत्र मागे घ्यावे अशा कट्टर हिंदुत्ववादी मागण्या करून शिवसेनेने आपण प्रखर हिंदुत्ववादी आहोत असा भासवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र असे पोरकट राजकारण करताना त्यांनी सावरकरांना भारतरत्न किताब देण्याची मागणी करावी ही गोष्ट म्हणावी तेवढी पचनी पडत नाही. या ठिकाणी सावरकर हे भारतरत्न पदवीस योग्य आहेत की नाही याचा काही संबंध नाही. पण शिवसेनेला हा अधिकार आहे का याची मात्र जरूर चर्चा केली पाहिजे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विचार नेमका काय होता याची शिवसेनेच्या नेत्यांना पुरेशी माहिती नाही असे दिसते. परंतु जर आज सावरकर हयात असते तर त्यांनी शिवसेनेला लाथाडले असते. कारण शिवसेनेचा विचार आणि सावरकरांचा विचार यामध्ये महदंतर आहे. महाराष्ट्रात नरेंद्र दाभोळकर यांची अंधश्रध्दा निर्मूलन समिती अंधश्रध्दा विरोधी कायदा व्हावा म्हणून संघर्ष करत होती. मात्र या संबंधातले विधेयक अडवून धरण्यामध्ये भाजपा आणि शिवसेनेचे आमदार आघाडीवर होते हे येथे नमूद केले पाहिजे. सावरकर जर हयात असते तर त्यांनी या विधेयकाला पूर्णपणे पाठिंबा दिला असता. कारण सावरकर हिंदुत्ववादी असले तरी पुराणमतवादी नव्हते. त्यांचा अंधश्रध्दांना नेहमीच विरोध होता.

वास्तविक शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष नव्हेच. तो खरा संकुचित प्रादेशिक पक्ष आहे. मराठी माणूस आणि त्याचे हित हा शिवसेनेचा विषय आहे आणि त्यावरच शिवसेना स्थापन झालेली आहे. परंतु नंतर भारतामध्ये हिंदुत्ववादी भावना वाढत चालली आहे हे शिवसेनेच्या लक्षात यायला लागले आणि तिथून शिवसेनेचे नेते या हिंदुत्ववादी दिंडीत सामील झालेले आहेत. हिंदुत्ववादी भूमिका घेतली की जास्त मते मिळतात हाच शिवसेनेच्या हिंदुत्ववादामागचा हेतू आहे. प्रत्यक्षात बाळासाहेब ठाकरे यांच्यासह कोणत्याही शिवसेनेच्या नेत्याने हिंदुत्ववादाचा विचार अभ्यासपूर्णरित्या मांडलेला नाही. हिंदुत्वाचे अनेक घटक आहेत. त्यापैकी कोणत्याही घटकाचा व्यासंग करून शिवसेनेच्या नेत्याने तो विचार जनतेसमोर मांडला आहे असे कधी घडले नाही. उगाच पोरकट मागण्या करून ते आपले हिंदुत्व सिध्द करण्याचा व्यर्थ प्रयत्न करत आहेत.

Leave a Comment