आता घरपोच बँकिंग सेवा देणार पोस्ट


नवी दिल्ली – आता देशभरात प्रायोगिक पातळीवर सुरू करण्यात आलेली इंडिया पोस्ट पेमेन्ट बँकेची शाखा सुरू करण्यासाठी सरकारकडून पावले उचलण्यात येत असून लवकरच बँकेच्या सेवा टपालवाहकाकडून (पोस्टमन) देण्यात येणार असल्याने टपाल विभाग आपल्या कामकाजात सुधारणा करत आहे. नागरिकांना या नवीन सेवेमुळे घरबसल्या खात्यातून पैसे काढता अथवा भरता येतील. सप्टेंबर २०१७पर्यंत देशात ६३०पोस्टल बँकेच्या शाखा उघडण्याचे लक्ष्य टपाल विभागाकडून ठेवण्यात आले आहे. सध्या पोस्टल बँकेची चाचणी रांची आणि रायपूर या दोन शहरांत सुरू आहे.

देशातील प्रत्येक जिल्हय़ात सप्टेंबर महिन्यापासून बँकिंग सेवा देण्यासाठी टपाल विभागाकडून जोरदार पावले उचलण्यात येत आहेत. गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी विमा, निवृत्तीवेतन आणि म्युच्युअल फंडची विक्री करण्यात येईल. यासाठी साधारण १०० देशी आणि विदेशी कंपन्यांबरोबर भागीदारी करण्यात आली असून याचा प्रारंभ २०१८ पासून करण्यात येईल. सामान्य नागरिकांना ज्या गुंतवणुकीच्या योजनांची माहिती आहे, त्यांनाच प्राधान्य देण्यात येईल, असे बँकेचे प्रमुख व्यवस्थापक ए. पी. सिंग यांनी म्हटले. आरबीआयच्या नियमानुसार पेमेन्ट बँकांना सामाजिक सुरक्षा, बिल भरण्याची सोय आणि १ लाखापर्यंतच्या ठेवीची सुविधा देता येईल. पोस्टल बँकेला कर्ज देण्याचा अधिकार नाही.

पोस्टल बँकेच्यामाध्यमातून घरबसल्या व्यवहारांची सोय देण्यात येणार असून या घरपोच सेवेसाठी १५ ते ३५ रुपये शुल्क आकारण्यात येईल. यात किमान रक्कम ठेवण्याची अट नाही. बचत खात्यावर ५.५ टक्के व्याज मिळणार आहे.

Leave a Comment