उनाकोटी- हजारो अद्भूत शिल्पांचे भांडार


नाजूकपणे वळणे घेत जाणार्‍या पायवाटा, घनदाट जंगल, दर्‍या, नद्या, ओहोळ असे मनोहर दृष्य, कित्येक अनोळखी वनस्पती, वन्य प्राणी यांची सोबत शिवाय भव्यदिव्य अशा शेकडो शिल्पांचे दर्शन घ्यायचे असेल तर त्रिपुराच्या उत्तर भागात जायला हवे. शहरापासून दूर, शांत वातावरणात मनःशांती मिळविण्यासाठी तसेच आपल्या भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा पाहण्यासाठी उनाकोटीला जरूर भेट द्यायला हवी. इतिहास, पुरातत्व आणि धार्मिक रंगात रंगलेला व अज्ञात शिल्पकारांनी नटविलेला हा परिसर पर्यटकांना आकर्षित करतोच करतो. अगरताळापासून १७० किमीवर असलेल्या या ठिकाणाला भेट दिली तर चहुबाजूंनी एखाद्या विशाल नकाशाप्रमाणे असणारी ही खडक शिल्पे पर्यटकांची भावसमाधी लावतात.


पौराणिक कथेप्रमाणे येथे हिंदू देवदेवांची सभा भरली होती व त्याला महादेव वाराणसीच्या मार्गावर असताना येथे उपस्थित झाले होते. या खडकांवर शिव व गणेश यांना समर्पित केलेल्या अक्षरशः शेकडो मूर्ती व शिल्पे आहेत. उभ्या खडकांत कोरलेला ३० फुटी महादेव उनाकोटीश्वर कालभैरव म्हणून ओळखला जातो. त्याच्या जटाच मुळी १० फूट लांबीच्या आहेत. या शिवाय मगरीवर विराजमान असलेली गंगा, नंदी बैल यांचीही शिल्पे आहेत.

गणेशाच्या तीन सुंदर मूर्ती येथे आहेत. मूळ गणेशमूर्तीबरोबरच तीन दातांचा साराभुज गणेश, चार दातांचा अष्टभुजा गणेश, चतुर्मुख शिवलिंग, नरसिंह, श्रीराम, रावण, हनुमान यांचीही शिल्पे आहेत तसेच तीन डोळ्यांचे एक शिल्प आहे ते सूर्याचे समजले जाते. काही जणांच्या मते हे विष्णुचे शिल्प आहे. पहाडरांगावरून येणारे पाण्याचे प्रवाह एका कुंडात जमा होतात त्याला सीताकुंड असे नांव आहे. हे कुंड पवित्र मानले जाते व येथे स्नान केल्याच पुण्यप्राप्ती होते असाही समज आहे. एप्रिल महिन्यात येथे अशोकाष्टमी मेळा भरतो. ही सारी शिल्पे ८ व्या किंवा ९ व्या शतकातील असावीत असे पुरातत्व तज्ञांचे मत आहे. हे स्थळ पर्यटनकेंद्र म्हणून विकसित करण्यासाठी सरकारने १.१३ कोटींचा निधी मंजूर केला असून त्यातून ५ किमीचा परिसर पर्यटकांना विविध सुविधा देण्यासाठी विकसित केला जात आहे.

Leave a Comment