मेंदूने टाईप करा, त्वचेने ऐका – फेसबुकची योजना


विकलांग लोकांसाठी वरदान ठरेल, असे तंत्रज्ञान फेसबुक विकसित करत आहे. या तंत्रज्ञानाद्वारे एखादी व्यक्ती प्रति शब्द १०० या गतीने केवळ मेंदूने टाईप करू शकेल. तसेच त्वचेने ऐकू शकेल. कंपनीने बुधवारी या तंत्रज्ञानाची माहिती दिली.

फेसबुकच्या ‘बिल्डिंग ८’ या प्रयोगशाळेत तब्बल ६० शास्त्रज्ञ, अभियंते आणि अन्य व्यक्ती या तंत्रज्ञानावर काम करत आहेत. याला फेसबुकने “निःशब्द भाषण संपर्क” (सायलेंट स्पीच कम्युनिकेशन्स) असे नाव दिले आहेत. या प्रकल्पांसाठी आवश्यक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर कंपनी उभारत आहे.

“तुम्ही थेट मेंदूने टाईप करू शकलात तर काय होईल,” असा प्रश्न फेसबुकच्या अभियांत्रिकी व ‘बिल्डिंग ८’ विभागाच्या उपाध्यक्षा रेगिना ड्युगन यांनी विचारला. फेसबुकच्या वार्षिक दोन दिवसीय डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये त्या बोलत होत्या.

“बोलण्यासाठी मेंदू करत असलेल्या हालचालींची निश्चिती करून प्रति मिनिट १०० शब्द टाईप करण्याची क्षमता निर्माण करणारी प्रणाली आम्ही येत्या २ वर्षांत तयार करू. हे अशक्य वाटू शकेल मात्र तुम्हाला वाटते त्यापेक्षा हे जास्त लवकर घडेल,” असे ड्युगन यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

मात्र ही संकल्पना नवीन नाही. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार मेंदू व संगणकाची जोडणी केल्यास अर्धांगवायू झालेल्या लोकांना थेट मेंदूद्वारे टाईप करता येणे शक्य आहे.

Leave a Comment