एक हात नसतानाही ती बनली सौष्ठवपटू


जन्मतःच एक हात नसतानाही शरीर सौष्ठवपटू बनून बिकीनी स्पर्धांमध्ये भाग घेण्याची दुर्दम्य कामगिरी अमेरिकेतील एका युवतीने करून दाखवली आहे.

डेव्हिन कॉफिन असे या २४ वर्षीय महिलेचे नाव आहे. ओशनसाईड, कॅलिफोर्निया येथे तिचा जन्म झाला. जन्मतःच तिला डावा हात नव्हता त्यामुळे लहानपणी तिला अनेक कष्टांना सामोरे जावे लागेल.

चार वर्षांपूर्वी २०१३ साली तिने तंदुरस्ती आणि शरीर सौष्ठवाकडे लक्ष देण्यास सुरूवात केली. आता बॉडीबिल्डिंग स्पर्धांमध्ये भाग घेत असून नॅशनल फिजिक कमिटी (एनपीसी) या संघटनेच्या स्पर्धांमध्ये ती बिकीनी मॉडेल म्हणून प्रसिद्ध आहे.

“स्वतःच्या शरीराबाबत परिस्थिती मान्य करण्यात मला लहानपणी खूप अवघड गेले. विकलांग म्हणून जन्म झालेला असला तरी व्यायामामुळे येणारी स्वातंत्र्याची भावना ही खरोखर मुक्त करणारी असते. व्यायाम करणे सुरू केल्यानंतर लवकरच मला त्याचे व्यसनच लागले,” असे डेव्हिनने डेली मेल या वृत्तपत्राला सांगितले.

डेव्हिनने स्वतः काही व्यायामप्रकार विकसित केले असून त्यांच्यामुळे तिला एका हाताने व्यायाम करूनही शरीराला आकार देता येतो. ती सध्या इन्स्टाग्राम या संकेतस्थळावर सक्रिय असून त्यावर तिला १४ हजार अनुयायी मिळाले आहेत. या ठिकाणी ती वेळोवेळी स्वतःची छायाचित्रे प्रकाशित करते.

Leave a Comment