‘विप्रो’च्या शेकडो कर्मचाऱ्यांना नारळ


नवी दिल्ली – कामगिरीत चुकार ठरलेल्या आपल्या शेकडो कर्मचाऱ्यांना देशातील तिसऱ्या क्रमांकाची सॉफ्टवेअर सेवा क्षेत्रातील कंपनी विप्रोने नारळ दिला आहे. सध्या कर्मचाऱ्यांच्या वार्षिक कामगिरीच्या मूल्यांकनाची प्रक्रिया कंपनीत सुरू असून, त्यायोगे अपेक्षेप्रमाणे कामगिरी नसणाऱ्या ६०० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविला गेल्याचे सूत्रांकडून उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार समजते. हा आकडा या संपूर्ण प्रक्रियेअंती २,००० च्या घरात जाऊ शकेल, असाही सूत्रांचा अंदाज आहे. डिसेंबर २०१६ अखेर या बेंगळुरूस्थित कंपनीच्या पटावरील कर्मचाऱ्यांची संख्या १ लाख ७९ हजार ऐवढी आहे.

दरवर्षी नियमितपणे आपल्या मनुष्यबळाची कंपनीच्या निर्धारीत व्यावसायिक लक्ष्यानुरूप चाचपणी करण्याची मूल्यांकन प्रक्रिया होत असते, त्यात चुकार ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत कठोरपणे निर्णय घेतला जाणेही स्वाभाविकच आहे, अशी या संबंधाने विप्रोच्या प्रवक्त्याने प्रतिक्रिया दिली. वर्षांगणिक बाहेरचा रस्ता दाखविल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वेगवेगळी असते असे नमूद करीत त्यांनी यंदा कमी केल्या गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येबाबत कोणतेही विधान करण्याचे टाळले.

Leave a Comment