व्हॉटसअॅपवरील आक्षेपार्ह पोस्टसाठी ग्रुपअॅडमिन जबाबदार


वाराणसी – यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसीमध्ये सोशल मीडियाचा वापर सांभाळून करावा लागणार आहे. यापुढे वाराणसीमध्ये सोशल मीडियाचा गैरवापर केल्यास थेट ग्रुप अॅडमिनवर कारवाई होईल. आक्षेपार्ह मजकूर, फोटो, व्हिडीओ आणि अफवा फेसबुक, व्हॉटसअॅपवरुन पसरवल्यास ग्रुप अॅडमिनला जबाबदार धरुन थेट तुरुंगात रवानगी करण्यात येईल. वाराणसीतील स्थानिक प्रशासनाने सोशल मीडियाचा वाढता गैरवापर कमी करण्यासाठी हे आदेश दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी हा लोकसभा मतदारसंघ असून स्वत: सोशल मीडियावर मोदी सक्रीय असतात. अनेकदा दोन समाजांमध्ये फेसबुक, व्हॉटस अॅपवरुन व्हायरल होणा-या आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओमुळे तेढ निर्माण होते, तणाव वाढतो त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत जिल्हा न्यायदंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी संयुक्तपणे जारी केलेल्या आदेशात सोशल मीडियावर पोस्ट केलेली माहिती चुकीची, दिशाभूल करणारी असेल तर, ग्रुप अॅडमिनवर गुन्हा दाखल केला जाईल असे म्हटले आहे. ग्रुपमधील अन्य सदस्यांनी टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्टसाठी ग्रुप अॅडमिनला जबाबदार धरता येणार नाही असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने डिसेंबर महिन्यात दिला होता.

Web Title: WhatsApp admins to be legally responsible for offensive content