युपीत झळकले काश्‍मि-यांविरोधात बॅनर


मेरठ : भारतीय लष्करातील जवानांवर काश्‍मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांविरुद्ध नाराजी व्यक्त करत उत्तर प्रदेशमधील एका संघटनेने उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या काश्‍मिरी नागरिकांना इशारा दिला आहे. काश्‍मिरींनो, उत्तर प्रदेश सोडा. नाहीतर..’, असा संदेश असलेले एक बॅनर मेरठमध्ये लावण्यात आले आहे. हे बॅनर उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेने लावले आहे. काश्‍मिरमध्ये दगडफेक होत असतानाचे छायाचित्र आणि बॅनर लावणाऱ्या संघटनेच्या अमित नावाच्या नेत्याचेही छायाचित्र बॅनरवर दिसत आहे.

काश्‍मिरी स्थानिकांनी राजस्थानमधील मेवर विद्यापीठात शिकणाऱ्या आठ काश्‍मिरी युवकांनाही मारहाण केली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी राजस्थानमधील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर देशातील विविध भागात असलेल्या काश्‍मिरी तरुणांच्या सुरक्षिततेची सर्व राज्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

राजनाथसिंह यांनी म्हटले आहे की, काही काश्‍मिरी तरुणांना मारहाण झाल्याचे समजले. हा प्रकार दुर्दैवी असून मी या प्रकाराचा निषेध करतो. काश्‍मिरी युवकांना चुकीची वागणूक देणाऱ्या प्रत्येकावर कडक कारवाई करण्यात येईल. मी सर्व तरुणांना आवाहन करतो की त्यांना काश्‍मिरी तरुणांना त्यांचे बंधू समजावे. देशातील कोणत्याही भागात कोणत्याही काश्‍मिरी तरुणांना मारहाण केली जाणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन मी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना करतो. काश्‍मिरमधील अनेक लोक देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि समृद्धीसाठी योगदान देत आहेत आणि हे कोणीही नाकारू शकत नाही.