रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्यास पेट्रोलियम मंत्रालयाचा विरोध


नवी दिल्ली : महाराष्ट्रासह आठ राज्यातील पेट्रोल पंप दर रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय पेट्रोल पंप डिलर्सच्या संघटनेने घेतला असला तरी या निर्णयाला पेट्रोलियम मंत्रालयाने विरोध दर्शवल्यामुळे सर्वसामान्य वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागेल, असे मोदी सरकारने म्हटले आहे.

‘मन की बात’ या कार्यक्रमातून आठवड्यातून एकदा इंधन न वापरुन बचत करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते. पण ही इंधन बचत वाहनचालकांनी स्वयंस्फूर्तीने करावी, पेट्रोल पंप बंद ठेवणे, हा त्यावरील उपाय नसल्याचे मोदी सरकारने ठणकावून सांगितले.

महाराष्ट्रातील प्रामुख्याने मुंबईसह दक्षिणेकडील तामिळनाडू, केरळ, कर्नाटक (मुख्यत्वे बंगळुरु भागातील), आंध्र प्रदेश, तेलंगणा, पुदुच्चेरी आणि हरियाणा या राज्यांचा यामध्ये समावेश आहे. १४ मेपासून येणाऱ्या दर रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ऑल इंडिया पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनने आपण या उपक्रमात सहभागी होणार नसल्याचे आधीच स्पष्ट केले होते. पब्लिक सेक्टरमधील ५३ हजार २२४ पेट्रोल पंपांपैकी ८० टक्के ‘ऑल इंडिया पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन’मध्ये येतात.

Web Title: Petroleum ministry red-flags move to shut petrol pumps on Sundays