नेताजींनी थकवले चार लाखांचे वीजबिल


इटावाह – उत्तर प्रदेशमधील वीज विभागातील अधिकाऱ्यांनी ‘व्हीआयपी’ संस्कृती संपविण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून केलेल्या तपासणीदरम्यान उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्याकडे चार लाख रुपयांचे वीजबिल थकित असल्याचे समोर आले आहे.

५ किलोवॅटपर्यंत वीज वापरण्याची परवानगी मुलायमसिंह यादव यांच्या निवासस्थानी असलेल्या वीजजोडणीला आहे. मात्र तपास पथक त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर त्यांनी तब्बल आठ वेळा मर्यादेपेक्षा अधिक वीज वापरली असून त्याचे बिलही थकित असल्याचे आढळून आले. त्यांनी त्यावेळी बिल भरण्यासाठी या महिनाअखेरपर्यंतची वेळ मागून घेतली. मुलायमसिंह यांच्या इटावाह मतदारसंघातील सिव्हीला लाईन्समध्ये त्यांचे भव्य निवासस्थान आहे. त्यांच्या निवासस्थानी एक डझनहून अधिक खोल्या आहेत. तेथे त्यांचा स्वत:चा वातानुकूलित यंत्रणेचा प्लॅंट आहे. शिवाय स्विमिंग पूल आणि अनेक लिफ्टही आहेत. तेथे ४० किलोवॅटची वीज पुरविण्यासाठी अधिकाऱ्यांनी अतिरिक्त शुल्क आकारून बदल करून घेतले आहेत.

Web Title: Out of power: Mulayam Singh's Rs 4-lakh power bills unpaid