मुस्लिम कारसेवक राममंदिरासाठी विटा घेऊन पोहचले अयोध्येत


अयोध्या : मुस्लिम कारसेवक मंचाचे (एमकेएम) सदस्य अयोध्येतील वादग्रस्त जागेवर मंदिर उभारणीस पाठिंबा दर्शवित जय श्री रामचा घोष करत ट्रकभर विटा घेऊन अयोध्येत दाखल झाले आहेत.

राममंदिर उभारणीसाठी त्यांनी सोबत एक ट्रक भरून विटाही आणल्या आहेत. एमकेएमचे अध्यक्ष मोहम्मद आझम खान याबाबत बोलताना म्हणाले, मी पठाण आहे. आमचे पूर्वज क्षत्रिय होते. मी दावा करतो की प्रभू रामचंद्रही क्षत्रिय होते. भारतीय मुस्लिमांचा राममंदिर उभारणीला पाठिंबा आहे. राममंदिर प्रेम, एकतेचा प्रसार करून लोकांच्या मनातील द्वेष दूर करेल.

मुस्लिम कारसेवक संघाने (एमकेएस) यापूर्वीही अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी बॅनर लावून पाठिंबा दर्शविला होता. अलिकडेच एमकेएसने उत्तर प्रदेशमधील फैझाबाद आणि लखनौ येथे मोठमोठे बॅनर्स लावून राममंदिर उभारणीस पाठिंबा दर्शविला आहे. आता एमकेएमनेही पाठिंबा दर्शविला आहे.