सोनूचे समर्थन करणाऱ्या दोन युवकांना भोसकले


नवी दिल्ली – अजानवरून प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगमने केलेल्या ट्विटवरून निर्माण झालेला वाद अजूनही शमलेला दिसत नाही. सोनू निगमला त्याच्या वक्तव्याला सोशल मीडियावर पाठिंबा देणे मध्य प्रदेशच्या दोन युवकांना चांगलेच महागात पडले असून मुलांच्या एका गटाने त्यांना सोनू निगमचे समर्थन केल्याने चाकूने भोसकल्याची घटना उज्जैन येथील फ्रीगंज भागात घडली. शिवम असे जखमी मुलाचे नाव असून त्याच्या मित्रालाही संशयितांनी चाकू भोसकून जखमी केले आहे.

गायक सोनू निगमने अजानची नमाज ध्वनीक्षेपकावरून वाजवण्यावर दोन दिवसांपूर्वी ट्विट केले होते. देशात यावरून मोठा वाद निर्माण झाला असतानाच त्याला समर्थन देणारेही पुढे आले होते. फेसबुकवरील एका पोस्टमध्ये यापुढे आपण आता फक्त सोनू निगमचेच गाणे ऐकणार असे उज्जैनच्या शिवमने म्हटले होते. फैजान खान नावाच्या एका मुलाने त्यावरून आपल्या ७ ते ८ मित्रांसह शिवमला त्याच्या या पोस्टबद्दल जाब विचारला आणि त्याला चाकूने भोसकले. या वेळी शिवमबरोबर त्याचा मित्रही होता. या टोळक्याने त्यालाही भोसकले. रूग्णालयात दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा संबंधित युवकावर दाखल केला आहे.