जॉन घेऊन येत आहे ‘सविता दामोदर परांजपे’


अभिनेता जॉन अब्राहमने बॉलिवूडमध्ये २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘विकी डोनर’ या चित्रपटाच्या माध्यमातून एक नवीन संदेश देत चित्रपट निर्मिती क्षेत्रात यशस्वीरित्या पदार्पण केले. जॉनने आजवर दमदार कथानकांच्या चित्रपटांना प्राधान्य देत त्याच्या ‘जेए’ निर्मितीअंतर्गत मद्रास कॅफे,रॉकी हॅण्डसम आणि फोर्स २ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती करणारा जॉन आता मराठी चित्रपटसृष्टीकडेही वळला असून जॉन ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाची निर्मिती करत आहे.

बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर आता जॉनने मराठी चित्रपटसृष्टीत उडी घेतली आहे. आता ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून त्याची माहिती स्वतः जॉननेच ट्विटरवरून दिली. सेटवरील एक फोटो शेअर करत, ‘जेए एण्टरटेन्मेन्ट्स मराठी फिल्मच्या ‘सविता दामोदर परांजपे’ चित्रपटाच्या सेटवरील पहिला दिवस… मी या चित्रपटाच्या कथेच्या प्रेमात पडलो आहे. अखेर मला चित्रपट निर्मिती करण्याची संधी मिळाली,’ असे त्याने ट्विटरवर लिहिले. या थ्रिलरपटाची कथा दगा देणाऱ्या पुरुषाचा एक महिला कशाप्रकारे सूड घेते यावर आधारित असून ‘फुगे’ चित्रपटाची दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जॉनच्या ‘सविता दामोदर परांजपे’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. अभिनेता सुबोध भावे आणि राकेश बापट यात मुख्य भूमिका साकारताना दिसतील.