सुशीलकुमार शिंदेंशी बाणेर अपघातातील आरोपीचा काहीही संबंध नाही ?


पुणे : पुण्यामध्ये एका महिला चालकाने काही दिवसांपूर्वी बेदरकारपणे गाडी चालवून रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजकावर उभ्या असलेल्या पाच जणांना चिरडले होते. त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची आरोपी महिला ही कन्या असल्याच्या चर्चांना उधाण आले. ही पोस्ट सोशल मीडियावरुन वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाली.

बाणेरमधील या अपघातात मायलेकीचा मृत्यू होऊनही सुरुवातीला आरोपी महिला चालक सुजाता श्रॉफवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता. त्यामुळे यामागे बड्या असामीचा हात असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. कुठलीही तथ्य तपासून न पाहता आरोपी सुशीलकुमार शिंदेंची द्वितीय कन्या प्रिती श्रॉफ यांनी हा अपघात घडवल्याचे म्हटले जात होते.

अखेर बाणेर परिसरात बेदरकारपणे कार चालवत पाच जणांना चिरडणाऱ्या सुजाता श्रॉफविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी याआधी केवळ निष्काळजीपणे वाहन चालवणे आणि अपघातानंतर निघून जाणे या कलमांअंतर्गत या महिलेला मंगळवारी अटक केली होती. या महिलेला काही वेळातच जामीनही मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका होऊ लागली होती.

सुशीलकुमार शिंदे यांच्याशी आरोपी सुजाता श्रॉफचे कुठलेही नाते नसल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ शिंदे यांची कन्या प्रिती यांचे आडनाव श्रॉफ असल्यामुळे दोघींचा संबंध जोडला जात असल्याचे समोर आले आहे. सुशीलकुमार शिंदे आणि श्रॉफ कुटुंबीयांना व्हायरल झालेल्या पोस्ट्समुळे हकनाक बदनामी आणि मनस्तापाला सामोरे जावे लागले.

स्थानिक रिअल इस्टेट व्यावसायिकाची आरोपी सुजाता जयप्रकाश श्रॉफ ही महिला पत्नी आहे. तर सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रिती या मुंबईतील व्यावसायिक आणि काँग्रेस नेते राज श्रॉफ यांच्याशी विवाहबद्ध झाल्या आहेत. पुण्याच्या बाणेर अपघातातील आरोपी ही सुशीलकुमार शिंदेंची कन्या असल्याची व्हायरल पोस्ट खोटी आहे.

Web Title: baner accident accused Does have no relation with the Sushilkumar Shinde