उन्हाळ्याच्या सुट्या लागल्याने अनेकांनी सहलींची योजना आखली असेल. पर्यटनासाठी देशातच नाही तर जगभरातील अनेक पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी उसळेल. मात्र पर्यटनाला जाताना ते आनंददायी व्हावे तसेच सुरक्षितही असावे याची काळजी घेणे आवश्यक असते. त्यानुसार तुम्ही देशातील पर्यटन स्थळांचा विचार करत असाल तर तुमच्या यादीतून शक्यतो खालील पर्यटनस्थळे टाळायचा प्रयत्न जरूर करा.
पर्यटनाला जाताय? शक्यतो ही ठिकाणे टाळा
सायलेंट व्हॅली, केरळ- केरळातील दाट जंगलात पर्यटकांना खूपच भावलेली ही सायलेंट व्हॅली देशातील मोठे राष्ट्रीय उद्यान म्हणून नावाजली गेलेली आहे. देशी विदेशी पर्यटकांचे हे आवडते ठिकाण आजकाल पर्यटकांसाठी फारसे सुरक्षित राहिलेले नाही. कारण या भागात पर्यटकांवर माओवाद्यांनी हल्ले चढविल्यामुळे येथे पर्यटकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
द्रास लडाख- जम्मू काश्मीरच्या दुर्गम लढाख भागातील द्रास हे जगातले दोन नंबरचे मानवी वस्ती असलेले सर्वात थंड ठिकाण आहे. येथेही दहशतवाद्यांचा उपद्रव नेहमी होतो. एकवेळ दहशतवाद्यांच्या गोळ्यांपासून आपण वाचू शकू पण येथील थंडी सहन करणे माणसाच्या सहनशक्तीबाहेर आहे. त्यामुळे अशा थंडीचा चांगला सराव असल्याशिवाय येथे जाणे धोक्याचे आहे. लडाख येथीलच फुगताल मॉनेस्ट्री किवा गोंपा असाच पर्यटकांसाठी धोक्याचा ठरू शकतो. उंच पहाडांच्या कडेवर या इमारती आहेत व तेथपर्यंत पोहोचणे हेच पर्यटकांसमोरचे मोठे आव्हान आहे. लडाखमधील खारदुंग्ला पास पर्यटकांची पसंतीची जागा आहे व तो जगातील सर्वात उंच ठिकाणचा मोटरेबल रोडही आहे. मात्र १८ हजार फुटांपेक्षा अधिक उंचावर असलेल्या या जागी ऑक्सिजनची कमतरता असते त्यामुळे येथे गेले तरी कांही मिनिटात येथून माघारी फिरावे लागते.
अक्साई चीन- आजकाल भारत पाक सीमेवरील अनेक ठिकाणांना भेट देण्याची क्रेझ पर्यटकांत वाढते आहे. तिबेट पठारावरचे अक्साई चीन हे विवादीत क्षेत्र असेच पर्यटकांचे आकर्षण बनते आहे. कुनलुन पर्वतरांगांखाली असलेले हे फारच देखणे व सुंदर स्थळ धोकादायक आहे याची जाणीव ठेवून येथील सहलींचा बेत ठरवावा.
ओडिसातील फलबानी नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असे पर्यटन स्थळ. भुवनेश्वरपासून २०० किमी वर असलेल्या या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते मात्र आजकाल येथेही माओवाद्यांचा उपद्रव असून त्यामुळे हे ठिकाण सुरक्षित राहिलेले नाही. आसामच्या मानस नॅशनल पार्कची हीच गत झाली आहे. पर्यटकांच्या स्वागतासाठी नेहमी तयार असलेल्या या जागेचा ताबा बोडो दहशतवाद्यांनी घेतला आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील हे ठिकाण प्रोजेक्ट टायगर रिझर्व्ह व एलिफंट रिझर्व्हसाठी प्रसिद्ध आहे.