पुण्यातील लष्कर न्यायालयात सोनू निगम विरोधात खटला


पुणे : पुण्यातील लष्कर न्यायालयात गायक सोनू निगम यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांच्यावर खासगी खटला दाखल करण्यात आला असून २४ एप्रिल रोजी त्याबद्दल वाय. पी. पुजारी यांच्या न्यायालयाने सुनावणी ठेवली आहे.

हा खटला अन्वर हुसेन बुडन शेख (बोपोडी) यांनी अ‍ॅड. वाजेद खान (बीडकर) यांच्यातर्फे दाखल केला असून भारतीय दंडविधानाच्या कलम १५३ ए आणि २९५ ए नुसार हा खटला दाखल करण्यात आला असून त्याचा क्रमांक १२९३/१७ आहे. शेख म्हणाले, निगम यांनी प्रसिद्धीसाठी वादग्रस्त वक्तव्य केले असून त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याने मी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद करण्यासाठी गेलो होतो. मात्र ती घेतली न गेल्याने न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयाने आमचा अर्ज स्वीकारला असून त्यावर २४ तारखेला सुनावणी ठेवण्यात आली आहे.